नंदुरबार – प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रशिक्षणाची सक्ती केली आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. या सशुल्क प्रशिक्षणाबाबत शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून सदर प्रशिक्षण हे निशुल्क करण्यात यावे अशी मागणी नाशिक विभागीय व्हि. जे. एन. टी. टीचर फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केली आहे.
बारा वर्ष सेवा करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो तसेच 24 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकास निवड श्रेणीचा लाभ देण्यात येतो. त्यानुसार राज्यातील शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी 23 डिसेंबरपर्यंत केली जात आहे. प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे चार गट तयार करण्यात आले आहेत .मात्र ऑनलाईन नोंदणी करताना शिक्षकांकडून दोन हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. यास व्ही. जे .एन. टी .टीचर फेडरेशन नाशिक विभागाकडून विरोध करण्यात आला आहे. शासनाने प्रशिक्षण आयोजित केले आहे तर निशुल्क असावयास हवे. त्याचा भार शिक्षकांवर कशासाठी? अशीही मागणी संघटनेकडून केली जात आहे.
राज्य शैक्षणिक परिषदेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना शिक्षकांना 23 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. जे कर्मचारी सेवा निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत या शिक्षकांना या प्रशिक्षणातून सूट मिळाली पाहिजे. प्रशिक्षणाअभावी शिक्षण विभागाकडून त्यांची अडवणूक होणार नाही अशीही देखील मागणी होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील बदल शिक्षकांना लक्षात यावे याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षानंतर हे प्रशिक्षण दिले जात असून ते ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. प्रशिक्षण हे आवश्यक असून या प्रशिक्षणासाठी असलेले दोन हजार रुपये शुल्क लावण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असल्याने हे शुल्क न आकारता हे प्रशिक्षण निःशुल्क देण्यात यावे.अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. – योगेश्वर बुवा.