नंदुरबार – एरवी सूनसान आणि दुर्लक्षित राहणारे दुर्गम धडगाव सध्या नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारानिमित्त चाललेल्या राजकीय धुमश्चक्रीमुळे दणाणून गेले आहे. शिवसेने पाठोपाठ आज गुरूवार दि.16 रोजी काँग्रेसनेही मोठी रॅली काढून धडगावात शक्ती प्रदर्शन घडवले. तर भारतीय जनता पार्टीतर्फे ऊद्या शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजी रॅली काढून शक्ती प्रदर्शन घडवले जाणार आहे.
धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु॥ नगरपंचायतच्या 17 वार्डातील निवडणुकीचे मतदान 21 रोजी आहे. शिवसेना 17, काँग्रेस 17, भाजपा 11, राष्ट्रवादी 1, अपक्ष 2 असे 48 उमेदवार रिंगणात आहेत. ईथे काँग्रेसचे नेते आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍडवोकेट के.सी. पाडवी यांच्या नेतृत्वाखाली हारसिंग पावरा व रतन पाडवी हे काँग्रेसचे पॅनल लढवत आहेत. तर दुसऱ्या बाजुने शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांंच्या नेतृत्वाखाली विजय पराडके शिवसेनेचेेे पॅनल लढवत आहेत. तर खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात शिवाजी पराडके व निर्मला गावित या भाजपाचे पॅनल लढवीत आहेत.असा तिरंगी सामना येथे रंगला आहे.
दरम्यान, आज दि.१६ रोजी धडगांव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस रणजित पावरा, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सि. के. पाडवी माजी समाजकल्याण सभापती विक्रम पाडवी, जान्या पाडवी, हारसिंग पावरा, खेमा पराडके, मतीन कुरेशी, तुकाराम पावरा तसेच काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करणाऱ्या 17 उमेदवारांसह पाड्या-पाड्यातून स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हेल्टीचापडा येथील भवनापासून रॅली प्रारंभ करून मोलगी रोड, फाॅरेस्ट कार्यालय,नगरपंचायत कार्यालय, मुख्य बाजार, बाबा चौक, एकलव्य चौक, पारशी चौक, सतीशनगर पर्यंन्त रॅली काढण्यात आली.
तत्पूर्वी शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 डिसेंबर रोजी धडगांव येथे शिवसेना उमेदवारांची रॅली काढत शिवसेनेनेही जोरदार शक्तिप्रदर्शन घडवले. त्यांच्यासमवेत जि.प.सदस्य विजयसिंग पराडके, माजी उपसभापती धनसिंग पावरा , जामसिंग पराडके, सेगा पावरा, शरीफ पिंजारी, अशरफ अली, फकिरा परमार, बंट्टी पाटील, लतेश मोरे, राजेंद्र पावरा, सर्व उमेदवार, आजी-माजी पदाधिकारी सहभागी होते.
नगरपंचायत विकासासाठी जो काही निधी लागेल तो मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निधी उपल्बध करुन देईन, असे आश्वसन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याप्रसंगी भाषणातून दिले. माजी सभापती रविंद्र पराडके यांच्या घराजवळून प्रारंभ करून प्रमुख मार्गांरून एकलव्य चौकापर्यंन्त ही रॅली काढण्यात आली.