नंदुरबार – अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील हॉटेल चालकाची 67 लाखांमध्ये फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असतानाच, शेअर्स खरेदी विक्री करणाऱ्या बनावट ॲपच्या माध्यमातून नंदुरबार शहरातील आणखी एका व्यापाऱ्याचे सुमारे 11 लाख 28 हजार रुपये लुबाडल्याचा गुन्हा नोंद झाला. शेअर्स खरेदी विक्रीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत बनू पाहणाऱ्यांना झटका देणाऱ्या या घटना असून बनावट ॲप द्वारे शेअर धारकांची लूट करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे.
नंदुरबार शहरातील व्यापारी पवनकुमार गोपीचंद मुलचंदाणी (वय- ३६), रा. गुरूनानक सोसायटी तळोदारोड, नंदुरबार ता. जि. नंदुरबार यांची शेअर्स ट्रेडिंगच्या बनावट ऍपच्या माध्यमातून फसवणूक झाली असून दि. १८ मे २०२४ ते दि.६ जून २०२४ दरम्यान हा प्रकार घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
लुबाडण्याची ‘ही’ आहे पध्दत
मोठया प्रमाणात रक्कम गुंतवावी यासाठी त्या बनावट अॅपद्वारे गुंतवणुक झालेल्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे वेळोवेळी दर्शवले जाते. बळी पडलेला व्यक्ती पैसे भरत राहतो. परंतु सदर अॅपचे अवलोकन केले असता निदर्शनास येते की, हया अॅपमध्ये एक बटन आहे जे थेट येणाऱ्या IPO ला लागु करते या बटनाचे नाव ATOMATICALLY TO IPO असे असुन ते बटन नेहमी चालु असते. त्या माध्यमातून जमा झालेली रक्कम लॉक करता येते. अपेक्षित मोठी रक्कम खात्यात जमा होताच बनावट ॲप वाले लॉक करून व्यवहार त्यांच्या बाजूने संपुष्टात आणतात. ॲप चालक खातेधारक आणि ग्रुप ॲडमिन हे सगळेच लोक परराज्यातील असल्याने त्यांचा मागोवा घेणे पोलीस यंत्रणेसाठी आणि रक्कम घालून बसलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा मोठ्या जिकरीचे बनून जाते.
‘शेअर्स’च्या नफेखोरीने केला घात
पवनकुमार मूलचंदाणी यांना शेअर्स – खरेदी विक्री व्यवहारामध्ये पैशांची गुंतवणुक करायची होती. त्यासाठी ते शेअर्स बाजाराचा अभ्यास करीत होते. त्यासाठी त्यांनी दि. १८/०५/२०२४ रोजी जीएफएसएल सिक्युरीटी ऑफिशिअल नावाच्या व्हॉटस्अप – ग्रुपमध्ये सहभाग घेतला. या व्हॉट्सअप ग्रुपचा अॅडमिन याने पवनकुमार यांना आरोपी जीएफएसएल नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर या बनावट ॲपच्या चालकाने पवन कुमार यांच्याकडून KYC ची मागणी केली. त्यानुसार पवनकुमार यांनी त्यांचे पॅनकार्ड, फोटो असे अॅपवर टाकले. त्यानंतर शेअर्स खरेदी विक्री व खरेदी साठी १ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पवन कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधील एसगोट टेक्नॉलॉजीस्ट लिमिटेड या खात्यावर 1 लाख रुपये जमा केले. दरम्यान, दि. २२/०५/२०२४ रोजी पवनकुमार यांनी कोणतीही शेअर्स खरेदीची मागणी केलेली नसतांना नमुद अॅपने स्वंयचलीत प्रकारे वेळोवेळी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करुन दिले. बनावट अॅपद्वारे गुंतवणुक झालेल्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दर्शवत राहिले. त्याला बळी पडून पवन कुमार यांनी वेळोवेळी खात्याद्वारे एकुण १३ लाख १८ हजार रुपयांची गुंतवणुक केली त्यानंतर ७६३०० व १,१२,७८० रु. हया रकमा शेअर्स विक्रीपोटी परत करुन मोठ्या रकमेची गुंतवणुक करावी म्हणुन आकर्षित केले परंतु त्या दरम्यान पवन कुमार यांना परिचयाच्या व्यक्ती कडुन समजले की हा फसवणुकीचा प्रकार आहे म्हणून त्यांनी अॅपमधील त्यांचे शेअर्सची विक्री करुन पैसे परत काढण्याचा प्रयत्न करून पाहिला तथापि दि. ०६/०६/२०२४ रोजी नमुद अॅपच हे बंद पडले. तेव्हा पवनकुमार यांना खात्री झाली की त्यांची ११,२८,९२०/- रु. फसवणुक करण्यात आली आहे. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी लगेचच धाव घेऊन नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
चार संशयतांविरोधात गुन्हा दाखल
पवनकुमार गोपीचंद मुलचंदाणी यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून जीएफएसएल सिक्युरीटी ऑफिशिअल नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन, जीएफएसएल नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे बनावट ऍप चालविणारा तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामधील एसगोट टेक्नॉलॉजीस्ट लिमिटेड खातेधारक आणि जाना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडमधील एचडी ग्लोबल एंटरप्राईजेस नावाचा खातेधारक असे चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शाम निकम अधिक तपास करीत आहेत.