तळोदा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करीत तळोदा येथील स्मारक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला आणि शहरध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
याप्रसंगी माजी आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले की, मोदी सरकारने जुलमी कृषी कायदे पास केले होते. या विरोधात शेतकऱ्यांनी लढा दिला, संघर्ष सुरू ठेवला. अखेर आज हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हाच निर्णय आधी घेतला असता तर शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले नसते, असेही मत पाडवी यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहर अध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र शत्रिय, पुरुषोत्तम चव्हाण, डॉ. रामराव आघाडे, संदीप परदेशी, केसरसिंग छत्रिय, अनिल पवार, आदिल शेख, कमलेश पाडवी, योगेश पाडवी, धर्मराज पवार, राहुल पाडवी, शेख नासीर पठाण, डॉ जगदीश मराठे, नितीन वाघ, आयुब पिंजारी, मुकेश पाडवी, जितेंद्र केदार, फिरोज खान, महेश जगदाळे, रामा पवार, अशोक पटेल, अंबालाल नवले आदींसह शेतकरी उपस्थित होते. समारोप प्रसंगी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.