नंदुरबार – शहादा तालुक्यातील मलगाव येथे एका शेतातून सुमारे 170 किलोग्राम वजनाची गांजा सदृश्य झाडे जप्त करीत शहादा पोलिसांनी धडक कारवाई केली. ११ लाख ९० हजार रुपये किमतीचा हा गांजा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शहादा तालुक्यात शेतातून मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वीच उघडकीस आले होते. तेव्हापासूून सतर्क झालेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तथा जिल्हा पोलीस दलाने गांजा लागवड करणाऱ्यांना हुडकून काढणे सुरू ठेवले आहे. अशातच नवनियुक्तत पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्याा मार्गदर्शनाखाली ही आणखी एक मोठी कारवाई घडवली.
प्राप्त माहितीनुसार पोलीस हवालदार मेहरसिंग बनसिंग रा.शहादा जि. नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहादा पोलीस ठाणे हद्दीत मलगाव शिवारात दि.४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजे दरम्यान, अजय पटले रा. मलगाव याने त्याच्या कपाशी पिकाच्या शेतात विना परवना बेकायदेशीरित्या गांजा सदृश्य झाडाची लागवड करुन संवर्धन व जोपासना केली. शेतात व घरी मलगाव गावात तपास करूनही मात्र तो सापडला नाही. पटले पसार झाला असल्याचा संशय आहे. तथापि गुंगीकारक औषधीद्रव्य झाडांची व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ लागवड करणे व विनापरवाना बेकायदेशीरित्या गांजा झाडाची लागवड करणे, या आरोपाखाली अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) २० (ब) प्रमाणे शेतमालक अजय पटले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.