नंदुरबार – महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व श्रीराम मंदिरांना विद्युत रोषणाई आणि महाप्रसाद पुरवणार असल्याची माहिती दिली असून श्रीराम मंदिराशी संबंधित व्यक्तींनी अथवा व्यवस्थापनाने संपर्क करावा असे आवाहन देखील केले आहे.
अयोध्येतील अत्यंत पवित्र अशा श्री राम जन्मभूमीत अत्यंत भव्य स्वरूपात श्री रामाच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी पार पडत असून सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक भारतीयां प्रमाणेच त्या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक गावात प्रत्येक मंदिरात रामनामाचा जागर सध्या सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र आतापासूनच राममय वातावरण बनलेले पाहायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महासंसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक राम मंदिराला विद्युत रोषणाई तसेच महाप्रसाद पुरविण्याचा निर्णय केला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश होतो त्या सर्व ठिकाणच्या राम मंदिरांना हे साहित्य पुरविले जाणार आहे तरी संबंधित व्यवस्थापनाने अथवा मंदिरातील जबाबदार व्यक्तींनी प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन देखील खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे. अयोध्येतील प्रमुख प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील किमान दहा हजार भाविकांना अयोध्येला येणार असल्याची घोषणा खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याच्यापूर्वीच केली आहे.