रक्तदान कार्याबद्दल श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ने सन्मान

नंदुरबार: सोशल मिडीयातून शेकडो रक्तदात्यांना एकत्र आणत व रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत हजारो गरजूंना रक्तदान करुन ‘जीवन’दान देणाऱ्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ देवून राजस्थानमधील कोटा येथे गौरव करण्यात आला. फाऊंडेशनच्या वतीने जीवन माळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

रक्तदान चळवळीत राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या राजस्थानातील कोटा येथील ह्यूमन सोशल फाऊंडेशन संस्थेच्यावतीने  रक्तदान जीवनदान समितीद्वारा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ या पुरस्कारांचा वितरण सोहळा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन व्हाटस् ॲप गृपच्या माध्यमातून दररोज गरजू रुग्णांना स्वयंस्फूर्तीने रक्तांच्या पिशव्या उपलब्ध करुन देणे तसेच जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास शेकडो बॅग उपलब्ध करुन देण्याचे कौतुकास्पद काम निस्वार्थपणे करण्यात येते. यामुळे सदर गृपच्या कार्याची दखल ह्यूमन सोशल फाऊंडेशनच्यावतीने घेत राष्ट्रीय स्तरावरचा  ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ देवून गौरव करण्यात आला.

कॉन्फरन्सला कोटा येथील महापौर राजीव अग्रवाल, जेष्ठ समाजसेवक अमित धारिवाल, ह्यूमन सोशल फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक सचिन सिंगला, रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटाचे संस्थापक नीरज सुमन आदी उपस्थित होते. संस्था सचिव गोपाल विजयवर्गीय यांनी रक्तदान चळवळीत काम करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला व इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी जीवन माळी म्हणाले, हा पुरस्कार व सन्मान माझा नसून सर्व रक्तदात्यांचा आहे. रक्तदान केल्याने एखाद्या गरजू रुग्णांचा जीव वाचतो आणि त्यांचा मिळणारा आशीर्वादच सर्वात मोठे पुण्य असते. म्हणून दात्यांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे यावे, असेही आवाहन जीवन माळी यांनी केले. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या चळवळीत महेंद्र झवर, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे, अजय देवरे, हितेश कासार, आकीब शेख व सुधीरकुमार ब्राम्हणे यांचेही योगदान लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!