संगीताला साधना म्हणून जगणार्‍या सर्वांच्या लाडक्या लताताई !

संगीताला साधना म्हणून जगणार्‍या सर्वांच्या लाडक्या लताताई !

लताताई म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार होत्या. व्यासपिठाच्या सन्मानार्थ आपली पादत्राणे व्यासपिठाखाली काढूनच त्या व्यासपिठावर जायच्या. गाणे गातांना ‘मी माझ्या आतील देवाला संतुष्ट करण्यासाठी गाते’, असा त्यांचा भाव असायचा. ‘प्रथम देवाला संतुष्ट करा, म्हणजे आपोआप गाण्याचा आनंद जगाला मिळेल’, असे त्या म्हणायच्या. अध्यात्माची बैठक असल्याविना संगीत होऊच शकत नाही; कारण सूर हाच एक ‘ॐ’कार आहे. तो जेथे नसेल, तेथे संगीत फार काळ टिकू शकत नाही. संगीताचा कुठलाही प्रकार घ्या, भावगीत आणि सुगमगीत यांनाही ईश्‍वराचे अधिष्ठान आवश्यक आहे; कारण संगीताची देवी ही ‘सरस्वतीदेवी’ आहे असे त्यांना वाटत असे. लताताईंनी संत तुकाराम महाराजांचे अभंग, श्रीमद्भगवद्गीतेचे अध्याय, मीराबाईंची भजने इत्यादींचे गायनही केले आहे. लताताईंना संतांच्या रचना गायला पुष्कळ आवडायचे. त्यांना संत मीराबाईंचे लहानपणापासून वेड होते. समर्थ रामदासस्वामी हे लताताईंचे श्रद्धेय होते. मनाचे श्‍लोक, दासबोध इत्यादींचे वाचन करतांना ताईंच्या डोळ्यांत नेहमी पाणी तरळायचे. लताताई नेहमी रामरक्षा आणि इतर स्तोत्रेही वाचत असत. असे अध्यात्मिक जीवन जगत त्यांनी संपूर्ण विश्वासमोर आदर्श ठेवला. त्यांच्याकडून परिपूर्ण जीवनाचे गमक आपण सर्वांनीच शिकूया !

स्वरमाऊली भारतरत्न लता मंगेशकर

आठ दशके भारताच्या नव्हे तर जगाच्या स्वरविश्‍वात आशयघन आणि अमृतस्वरांचे सिंचन करून मंत्रमुग्ध करणार्‍या तसेच श्रोत्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवणार्‍या स्वरसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर.  त्या गानसरस्वतीच होत्या.
त्यांच्या सहवासात सर्वांना विलक्षण शक्ती, ऊर्जा जाणवायची. त्या चालते-बोलते विद्यालयच होत्या. त्या राष्ट्रभक्त होत्या. त्या स्वरांच्या माऊली म्हणजे स्वरमाऊली होत्या. त्यांच्यातील नम्रता आणि परिपूर्ण करण्याचा गुण होता. भारताच्या गानकोकिळा‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लतादीदी सुमधूर गीतांमुळे जगाच्या कानाकोपर्‍यात भारताची किर्ती पोहोचवत होत्या. प्रत्येकाने भारताला जगाच्या पाठीवर उत्तुंग शिखरावर नेऊन देशप्रेमाचे गाणे गाणे हीच खऱ्या अर्थाने लता दीदींना श्रध्दांजली होईल असे वाटते !

– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!