नंदुरबार – आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबारला सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये खर्चाच्या तापी पाणी योजनेचा लाभ होणार असून पाणीपट्टीचा नया पैसाही न वाढवता शहरवासीयांसाठी ही नवीन पाणी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. कारण लोकांवर भार लादणारे नव्हे, तर आम्ही कायमच लोकहिताचं राजकारण करतो; अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली. त्याचबरोबर ही माहिती देताना “सध्या जे चाललंय ते बिन बुडाचं राजकारण आहे”; अशा शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना टोला लगावला. कोणतीही योजना अथवा घटना यांचे निमित्त साधून गावित परिवाराला टीकेचे लक्ष बनवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर गावित यांनी हे वक्तव्य केले.
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज सोमवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी दुपारी पत्रकार परिषदेत योजनांविषयी माहिती दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित याप्रसंगी म्हणाले,योजनांचा लाभ देताना माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर आर्थिक भार येणार नाही याची मी कायमच काळजी घेतली. कोणतेही विकास काम करताना एकीकडे लोकांना लुबाडायचे, लोकांवर आर्थिक भार लादायचे आणि दुसरीकडे शहरवासीयांचे आपणच मसीहा असल्याचा देखावा करायचा; अशा दुटप्पी नेत्यांप्रमाणे आम्ही कधी वागलो नाही आणि तसल्या प्रकारचे काम केले नाही.
आपण सर्व जाणतातच की, राजकारणात आल्यापासून नंदुरबार शहराला रस्ते, उड्डाण पूल, पाणी आणि तत्सम मूलभूत सुविधा मिळवून द्यायला मी कायमच प्राधान्य दिले. मागील 30 वर्षाच्या वाटचालीत नंदुरबार शहरातील लोकोपयोगी अनेक निर्णय केले काम केले. जसे की नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न सोडवणारा विरचक प्रकल्प पूर्णत्वास येणे आवश्यक होते त्याकाळी महाराष्ट्र शासनाकडून वीरचक धरणाला सर्वात मोठा निधी आम्ही मिळवून दिला. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी मंजुरी मिळवून देण्यापासून निधी मिळवून देण्यापर्यंत त्याकाळी यशस्वीपणे काम करू शकलो. त्या योजनेचा दहा टक्के लोकवर्गणीचा भार लोकांवर येणार होता परंतु लोकांना आर्थिक ताण पडू नये म्हणून शासनाकडे प्रयत्न करून मी तो भार कमी करून दिला होता. शहरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर उभारले गेले तेव्हा सुद्धा 25% निधीचा भार शहरवासीयांना उचलावा लागणार होता परंतु नंदुरबार शहरातील लोकांना त्याचा आर्थिक फटका बसू नये म्हणून तत्कालीन राज्य शासनाकडे आमचे राजकीय बळ वापरून तो निधी माफ करून घेतला होता. टोल नाक्याचा आर्थिक भार शहरवासीयांवर पडणार होता. लोकांना तो भूर्दंड बसू नये म्हणून त्याकाळी मंत्रिपदाच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारण्यासाठी मोठा निधी मिळवून दिला. लोकांना झळ बसणार नाही अशा पद्धतीने विकासकाम साकार करण्याची आमची भूमिका राहिली.
आता विद्यमान परिस्थितीत सुद्धा नंदुरबार शहरातील लोकांना कोणतीही झळ बसू न देता नवीन तापी पाणीपुरवठा योजना आपण साकार करीत आहोत. नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे आणि म्हणूनच पर्यायी उपाय म्हणून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेचा राज्य शासनाकडे मागील वर्षापासून भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि मी आणि सातत्याने पाठपुरावा करीत आलो. त्याला यश मिळाले असून ही योजना पूर्णत्वास येण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळे पुढील काळात नंदुरबार वासीयांचा पाणी प्रश्न पूर्णतः सुटलेला दिसेल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरवासी आज जी पाणीपट्टी भरत आहे त्यापेक्षा एक पैसाही जादाची पाणी पट्टी आकारली जाणार नाही, त्यांना कोणताही आर्थिक भार पडणार नाही; हे मी जाहीर आश्वासन देतो. एकीकडे लोकांना लुबाडायचे, लोकांवर आर्थिक भार लादायचे आणि दुसरीकडे शहरवासीयांचे आपणच मसीहा असल्याचा देखावा करायचा; अशा दुटप्पी नेत्यांप्रमाणे आम्ही वागणार नाही, हे मी या माध्यमातून आश्वासित करतो.