नंदुरबार – समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या पुस्तक लेखकांना शासनमान्यता देऊच नका, अशी भूमिका समरसता साहित्य परिषदेतील समस्त साहित्यिक लेखकांनी जाहीर केली आहे. “महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोबाड घांदी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला दिलेला पुरस्कार शासनाने परत घेतला, याबद्दल समरसता साहित्य परिषदेला समाधान वाटते आहे. यासाठी समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करत आहे.” असे स्पष्टपणे ही भूमिका मांडताना नमूद केले आहे.
समरसता साहित्य परिषदेने म्हटले आहे की, साहित्याचा हेतू समाज जोडण्याचा हवा, तोडण्याचा नव्हे. नक्षलवाद- माओवाद आणि दहशतवाद हे भारताचे शत्रू असून संवैधानिक मार्गाऐवजी हिंसेचा अवलंब करणारे मार्ग आहेत. त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरस्कार करणारे मग ते साहित्यिक असोत वा अन्य कुणीही; त्यांचा निषेधच व्हायला हवा. समाजात भेद निर्माण करणाऱ्या सर्वच साहित्यकृती, कलाकृतींना समाजाने पुढे होत संवैधानिक मार्गांनी विरोध करावा आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती- संस्था- समूहांनाही समर्थन देऊ नये, असे समरसता साहित्य परिषदेला वाटते.
समाजस्वास्थ्य व बंधुतेला हानी पोहचवणाऱ्या मार्गांचे उदात्तीकरण करणाऱ्या व्यक्ती व लिखाणाला पुरस्कार देऊन संबंधीत निवड समितीने घोडचूक केली होती. ती राज्य सरकारने दुरुस्त केली, हे चांगले झाले. यापुढे शासकीय विभागांनी अधिक काळजीपूर्वक पुरस्कार निवड समिती सदस्यांची आणि पुस्तकांची निवड करावी. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी कुठल्याही राजकीय प्रभावाखाली काम न करता निरामय वाड्मयीन निष्ठेने कार्य करणे अपेक्षित आहे. एकूणच पुरस्कारासाठी ग्रंथ निवड प्रक्रीयेबाबत सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा यासाठी शासनाने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी मागणी समरसता साहित्य परिषद करीत आहे.
आज या पुस्तक व पुरस्काराला समर्थन देणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. आपल्या राजकीय विमर्शाला पुढे रेटण्यासाठी पुरस्कार वापसी करणाऱ्या बुद्धीजीवींनी साहित्यासारखे निर्मळ क्षेत्र खराब करू नये असे आवाहन समरसता साहित्य परिषद करीत आहे.
डॅा. ईश्वर नंदपुरे- अध्यक्ष (नागपूर) डॅा. प्रसन्न पाटील- कार्यवाह (छत्रपती संभाजीनगर), कार्यकारिणी सदस्य- रवींद्र गोळे, योगिता साळवी, धीरज बोरीकर (मुंबई), सुनिल ढेंगळे (ठाणें), विजय मोरे (कल्याण), सुहास घुमरे (पिंपरी चिंचवड), काशिनाथ पवार (पुणें), डॅा. रमा गर्गे (कोल्हापूर), डॅा. गजानन होडे (नाशिक), डॅा. शंकर धडके (सोलापूर), महेश अहेराव (धरणगांव), स्नेहलता स्वामी (नांदेड), दामोदर परकाळे (शेगांव), डॅा. राजेंद्र नाईकवाडे, डॅा. विजय राठोड (नागपूर) यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.