नंदुरबार : फक्त वरिष्ठांचा आदेश असेल तेव्हा तेवढ्यापुरता किंवा एखादा सप्ताह अथवा विशेष दिनासंबंधित कार्यक्रम साजरा करण्यापुरता स्वच्छता अभियान राबवणारी मंडळी आपण सर्वत्र पाहत असतो. परंतु असे काही नसताना केवळ सेवाभाव म्हणून रेल्वे स्थानकाचा कानाकोपरा कोणीतरी एकट्याने झाडून स्वच्छ केल्याचे कधी कुणी पाहिलंय का? याचे उत्तर ‘नाही’ असेच येऊ शकते. पण एका ज्येष्ठ स्वच्छता कर्मचाऱ्याने आपले घर अथवा मंदिर जितके स्वच्छ झाडले जाते, त्याहून अधिक बारकाईने स्वच्छता करीत चक्क नंदुरबार रेल्वे स्थानकाचा प्रत्येक कानाकोपरा अत्यंत स्वच्छ आणि चकाचक करून दाखवला आहे. एवढा मोठा परिसर कचपटसुध्दा शोधून सापडणार नाही इतका स्वच्छ एकट्याने श्रमदान करून एक हाती स्वच्छ करावा ही या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेली कृती आज चर्चेचा विषय बनली आहे.
हा आश्चर्य करायला लावणारा सेवाभाव जपणाऱ्या आणि कृतीत आणणाऱ्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे नाव आहे कुंदन थनवार ! हे कुंदन थनवार अखिल महाराष्ट्र राज्य सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. वयाने ते 65 वर्षांचे आहेत. असे असताना काल दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी न थकता पूर्ण दिवसभर राबराब राबून कानाकोपरा स्वच्छ केला. ज्येष्ठ वयाच्या व्यक्तीने दाखवलेला हा सेवाभाव आणि केलेले श्रम सलाम ठोकावा असेच आहेत.
एरवी रेल्वेस्थानक म्हटले की तिथे कमालीची अस्वच्छता आणि घृणा वाटावी ईतका अमंगळपणा निदर्शनास पडतो. लोकांच्या नजरेला ते सवयीचे देखील झाले असून त्यात कोणाला चूक वाटत नाही. परंतु नंदुरबार रेल्वे स्थानक याला अपवाद ठरले असून स्थानकाचा प्रत्येक कानाकोपरा चकाचक बनला आहे. ज्येष्ठ कर्मचारी थनवार यांनी कलेलं नंदुरबार रेल्वे स्थानक परिसर स्वमर्जीने उत्स्फूर्तपणे एकट्याने झाडून स्वच्छ करण्याचे काम शंभर पटीने प्रेरणादायक ठरावे असेच म्हटले जात आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरात पाय ठेवताच आज आपल्याला चौफेर स्वच्छता दिसते. वाहनतळ असो, त्या समोरील स्तंभ आणि कारंजा चा भाग असो, तिकीट खिडकी कडे जाणारा रस्ता असो किंवा स्थानक परिसरातील कोणतीही गॅलरी आणि विभाग असो सर्वत्र नजरेत भरेल एवढी स्वच्छता पाहायला मिळते.
यात उल्लेखनीय असे आहे की, नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अधीक्षक पदचा कार्यभार सांभाळणारे प्रमोद बाजीराव ठाकूर हे स्वतः जातीने लक्ष ठेवून असतात. गूळणा टाकून, गुटखा थुंकून अथवा खाद्यपदार्थांचे कागद फेकून व तत्सम स्वच्छतेचे नियम तोडणाऱ्या अनेकांना त्यांनी दंड ठोकला आहे. या कार्यपद्धतीची छाप रेल्वेस्थानकात उमटलेली पहायला मिळते. दरम्यान काही दिवसापूर्वी पश्चिम रेल्वे विभागातर्फे ऊधना-जळगाव मार्गावरील नंदुरबार रेल्वेस्थानकावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत स्वच्छता अभियान मागील महिन्यात राबविण्यात आले. त्याप्रसंगी अभियानाचे अध्यक्ष सहायक मंडल विद्युत इंजीनियर अमित कुमार साहू, ए डी ई एन राकेश कुमार रंजन, ए ओ एम रामेश्वर प्रसाद, एडीएसटी सतीश लहरी यांच्यासह वरिष्ठांनी येथील कामाचे कौतुक केले होते.
अभिवादन आणि अभिनंदन