नंदुरबार – महाराष्ट्रात सर्वत्र शीतलहर निर्माण झाली असून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात गोठवणार्या थंडीने त्रासले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात तर हिमवृष्टीचा अनुभव स्थानिक ग्रामस्थांना रोजच येऊ लागला आहे.
गोठवून टाकणारा कडाक्याचा गारठा, वाहणारी थंडगार हवा यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील किमान तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. शहरवासी असह्य थंडीमुळे त्रासले असून दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दाब, वालंबा, बीडपाडा परिसरात जिल्ह्यातील तापमानापेक्षा चार अंशाने तापमान कमी असते. परिणामी त्या भागातील तापमान सध्या कमालीचे खालावले आहे. दवबिंदू आणि सामान्य पाणी गोठवणारा गारठा तिथे आहे याचा अर्थ तीन अंश सेल्सिअस पर्यंत तेथील तापमान घसरलेले असावे. स्थानिक ग्रामस्थांनी आज पुन्हा तेथील बर्फाच्छादित सदृश्य स्थिती दर्शवणारे छायाचित्र मोबाईल मध्ये टिपले.
दरम्यान आणखी पाच दिवस हे थंडी वाढत राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषि हवामान केंद्राने कळविले आहे की, पुढील पाच दिवस जिल्ह्यात थंडी जास्त राहील तसेच हवामान कोरडे राहील. किमान तापमान ७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.३० जानेवारीपासून तापमानात घट होऊन थंडी कमी होण्याची शक्यता आहे. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस च्या पुढे गेल्यावर करावी. पपई व केळी यासारख्या पिकांना थंडीपासून संरक्षणासाठी प्लॅस्टिक बॅगचे आवरण लावाव पिकांना हलके पाणी देण्याची व्यवस्था करावी. जनावरांचे व कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करावे, असेही म्हटले आहे.
आज 26 जानेवारी 2022 रोजी डाब आणि वालदा परिसरात सकाळी 6 वाजे दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी असा टिपला हिमवृष्टीचा नजारा
काल 25 जानेवारी 2022 रोजीची स्थिती दर्शवणारे ही काही छायाचित्रे: