साम्यवाद आणि भांडवलशाही निष्फळ ठरण्याचे कारण:
गेल्या शतकात या जगाने अर्थरचनेचे २ मोठे प्रमुख प्रवाह पाहिले. एक होती भांडवलशाहीवर आधारित मुक्त बाजारव्यवस्था आणि दुसरी होती साम्यवादी रचना ! काळाच्या ओघात या दोन्ही रचना कोलमडून पडल्या आहेत. साम्यवादाने येणारा ताण असह्य झाल्यामुळे रशियाच्या जनतेने तो फेकून दिला. भांडवलशाहीचे तसे अजून झालेले नाही; कारण तो ताण आणि त्रास समोरून वार करणारा नाही, तर छुपा आहे आणि हलकेच पोखरत नेणारा आहे. आज विकसित आणि अविकसित असे सर्वच देश त्यातून जात आहेत. भांडवलशाहीमध्ये ज्यांना सुख मिळवण्याची साधने मिळतात, ते त्यातून सुख उपभोगत रहातात, पैसा मिळवत रहातात आणि सर्व काही अनिर्बंध होऊन जाते. यातून सत्ताधार्यांचे अनेक गट निर्माण होतात. ही सत्ता मूलत: संपत्तीतून निर्माण होते. ती अर्थकारण, समाजकारण अन् पर्यावरण यांवर गाजवण्यात येते.
इंग्रजीत एक म्हण आहे, ‘‘सत्ता भ्रष्ट करते आणि संपूर्ण सत्ता संपूर्णपणे भ्रष्ट होण्यास बाध्य करते’’, (power corrupts and absolute power corrupt absolutely) याचीच उदाहरणे या दोन्ही अर्थकारणांमध्ये आपल्याला दिसून येतात. भांडवलशाहीत ज्याच्याकडे साधने असतात, तो सत्ताधारी होतो, तर साम्यवादामध्ये ज्याच्याकडे सत्ता असते, त्याच्याकडे साधने एकवटतात. अध्यात्मामध्ये व्यक्ती आणि समाज यांविषयी प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म यांचा मूलभूत सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येकाचे प्रारब्ध निराळे असते. हे लक्षात न घेता साम्यवाद सर्वांना समान देण्याचा हेका धरतो आणि व्यक्तीला प्रारब्धामुळे मिळालेले किंवा मिळणार असेल, तेही काढून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रारब्धानुसार ज्याला जे मिळेल, ते ज्याला यथायोग्य भोगू देणे, ही सामाजिक समानता आहे. त्यामुळे ते हिसकावून घेणे, हे अनैसर्गिक आहे.
निसर्गनियमांच्या विरुद्ध जाऊन बुद्धीकौशल्याची कामे करणारे आणि कष्टाची कामे करणारे यांना समान वेतन दिल्याने रशियात साम्यवाद निष्फळ ठरणे : साम्यवादाच्या तत्त्वानुसार रशियामध्ये बुद्धीकौशल्याची कामे करणारा आणि कामगार यांना सारखेच वेतन दिले जात असे. त्यामुळे बुद्धीकौशल्याची कामे करणारा आणि कामगार यांच्यात शिथिलता येऊन त्यांनी कष्ट करणे सोडून दिले. निसर्गनियमांच्या विरोधात जाऊन समाजाच्या क्रियमाणावर अतिरेकी भर देण्यात आला. त्यामुळे तेथे साम्यवाद निष्फळ ठरला.
काम आणि कौशल्य यांनुसार आर्थिक मोबदला मिळत असल्याने अर्थलोभापायी समाजाला रसातळाला घेऊन जाणारी भांडवलशाही ! : भांडवलशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचे काम आणि कौशल्य यांनुसार मोबदला मिळतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती अधिक पैसा मिळवण्यासाठी अधिक काम करण्याचा प्रयत्न करत असते. अर्थशास्त्रात नीतीनियमांना स्थान नसल्याने प्रत्येक जण ‘पळा पळा, कोण पळतो पुढे’, यानुसार संपत्तीकडे धावत असतो. त्यामुळे व्यक्तीने किती क्रियमाण वापरावे, याला काही धरबंध रहात नाही. यातून मिळेल तेवढे ओरबाडण्याची वृत्ती जन्म घेते. भांडवलशाहीचे वार समोरून दिसत नाहीत; कारण ते मायावी असतात. ते सुखाचा आभास करतात आणि शेवटी सर्व समाजाला रसातळाला घेऊन जातात. त्यामुळे आपण जे मिरवत असतो, ते प्रत्यक्षात यश नसून आपले दुर्दैव असते; पण हे समाजाला कळत नाही.
समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी धर्माधिष्ठित अर्थशास्त्र आवश्यक !
अर्थशास्त्र ज्या गोष्टी अपरिहार्य आणि असाध्य असल्याचे गृहीत धरून त्यांना जिंकण्यापेक्षा त्यांना वळसा घालून जाण्याचा प्रयत्न करते, त्या गोष्टी अध्यात्म सहजसाध्य करून दाखवते. अध्यात्म अंगीकारलेल्या समाजाचे अर्थशास्त्र हे अल्प गरजा असणारे आणि इतरांचा अधिक विचार करणारे असेल. त्यामुळे साम्यवादी आणि भांडवलशाही या दोन्ही अर्थशास्त्रीय रचनांचे तोटे त्यात येणार नाहीत; म्हणून अध्यात्म अंगीकारलेल्या समाजाचे धर्माधिष्ठित अर्थशास्त्र सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर,
राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.
(‘सनातन प्रभात’ या दैनिकातून साभार)