जळगाव – सध्या सायबर क्राईम चे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनी मधील सजगता वाढावी यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी एमबीएच्या च्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देवून जनजागृती करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, क्विक हील फाउंडेशन पुणे आणिमहाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी हा उपक्रम घेण्यात आला. यात संगणकशास्त्र प्रशाळेचे विद्यार्थी जय पंडित व भावेश थोरात यांनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे जाऊन एमबीएच्या च्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देवून जनजागृती केली.
फसवणूक करणारी व्यक्ती / ॲप कशी ओळखायची ? हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, कमी रकमेचे कर्ज (२००० – २५०००) कोणत्याही गॅरेंटर, तारण किंवा कागदपत्रांशिवाय देऊ केले जाते. कर्ज न मागता किंवा तुम्ही जेव्हा मागता तेव्हा लगेच दिले जाते. काही वेळा तुमच्या खात्यात कर्जाऊ रक्कम जमा करण्यासाठी फक्त चौकशी पुरेशी असते. तुम्हाला ईमेल, फोन, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्स ऍप मेसेजद्वारे सतत आकर्षक ऑफर दिल्या जातात.कोणीही तुम्हाला प्रत्यक्ष भेटत नाही किंवा कार्यालयाचा पत्ता सांगत नाही.
फसवणूक रोखायची कशी? यावर प्रबोधन करताना त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या अॅप्स / लिंकवर कधीही विश्वास ठेवू नका. कागदपत्रे, गॅरेंटर किंवा काहीही तारण ठेवल्याशिवाय कोणीही कर्ज देत नाही. कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याचा आग्रह धरा. व्यक्तीला भेटल्याशिवाय फसव्या ग्राहकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.इंटरनेटवर कर्ज देणाऱ्या संस्थेचे तपशील, स्थानिक पत्ता, संपर्क तपशील आणि पदाधिकारी यांची नावे घेऊन त्यांना भेटून त्यांचे तपशील तपासा, असेही जय पंडित व भावेश थोरात यांनी सांगितले.
त्यावेळी संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनीष जोशी, समन्वयक श्री. राजू आमले आणि क्विक हेल फाउंडेशन पुणेतर्फे महेश भर्डी आदी उपस्थित होते.एकूण 120 विद्यार्थ्यी या कार्यक्रमात उपस्थित होते.