नवी दिल्ली – ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा आणि मानकांचे ऊल्लंघन करणारे प्रेशरकुकर आदी वस्तू खरेदी करू नका, असा ईषारा पुन्हा देण्यात आला आहे. दरम्यान, सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोषी ई कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेत कारवाईला सुरवात केली आहे. या संदर्भात 15 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
वैध आयएसआय मानकाशिवाय आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यापासून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहकांना सावध केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 18(2)(j) अंतर्गत प्राधिकरणाने ही सुरक्षा नोटीस जारी केली आहे.
ग्राहकांना इजा आणि नुकसान पोहोचू नये यासाठी आणि आवश्यक सुरक्षा तसेच तांत्रिक निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरोच्या कलम 16 अंतर्गत, दर्जा राखण्यासाठी आणि मानक चिन्हाचा अनिवार्य वापर करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. गुणवत्ता नियंत्रण आदेश या स्वरुपात हे निर्देश प्रसिद्ध केले जातात.
याआधी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 6 डिसेंबर 2021 रोजी सुरक्षा नोटीस जारी करत, अनिवार्य निकषांचे उल्लंघन करणाऱ्या हेल्मेट, प्रेशर कुकर, स्वयंपाकाचा, गॅस सिलेंडर खरेदी करताना ग्राहकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तूंची, ग्राहक अंतर्गत संरक्षण कायदा 2019 अंतर्गत सदोष म्हणून गणना होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने,बनावट वस्तूं विरोधात याआधीच देशव्यापी मोहीम सुरु केली आहे.
सक्तीच्या मानकांचे उल्लंघन करत प्रेशर कुकरची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोषी ई कॉमर्स कंपन्या आणि विक्रेत्यांची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्वतःहून दखल घेत कारवाईला सुरवात केली आहे. या संदर्भात 15 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अंतर्गत आवश्यक कारवाईसाठी ही प्रकरणे भारतीय मानक ब्युरो कडेही सोपवण्यात आली आहेत. गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्या बाबत भारतीय मानक ब्युरोनेही देशांतर्गत प्रेशर कुकरसाठी 3 तर हेल्मेट साठी 2 नोटीसा पाठवल्या आहेत.