वाचकांचे पत्र :
प्रति,
माननिय संपादक,
कृपया प्रसिद्धीसाठी,
साहित्यिकांनो सरस्वती पूजक बना!
ज्या सरस्वती देवीच्या कृपेमुळे विद्या प्राप्त होऊन साहित्य निर्माण होते, त्या सरस्वती देवीचे पूजन डावलणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, म्हणजे श्री सरस्वती माते बद्दल कृतघ्नता दर्शवणारे साहित्य संमेलन आहे असे वाटते. आपणा सर्वांना माहितीच आहे सध्या नाशिक येथे साहित्य संमेलनाच्या उद्घाटना मध्ये विद्येची देवता श्री सरस्वती देवीचे पूजन डावलण्यात आले. खरे तर ज्या व्यासपीठावरून स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी कुसुमाग्रज, वि. वा .सावरकर, प्र. के.अत्रे इत्यादी मान्यवर साहित्यिकांनी आपल्या उपास्य दैवताला मानवंदना दिली, तिथेच सरस्वतीपूजन डावलले जाणे म्हणजे दुर्दैवच म्हणावे लागेल. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नाशिक , हे एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमी मध्ये अशी घटना घडली. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या सांगण्यावरून सरस्वती पूजन न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला, असे विधान करून आयोजकांनी बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे.आपणा सर्वांना महाराष्ट्रातील संत परंपरा माहित आहे या संत परंपरांचा इतिहासाचा अभ्यास जरी आयोजकांनी केला असता तरी सरस्वती पूजनाचा निर्णय घेण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारून सरस्वतीपूजन केले असते. भारुड, अभंग , काव्य,गद्य,पद्य या प्रकारचे संत साहित्य आजही सर्व समाजासाठी दिशादर्शक आहे. महाराष्ट्राला साहित्याचा वारसा संतांकडूनच लाभला आहे. त्यामुळे हे संत साहित्य महाराष्ट्रातील घराघरात नव्हे तर मनामनात पोहोचले आहे.संतांच्या साहित्यामध्ये तो गोडवा आहे त्याचे कारण संतांमधील विनम्रता, प्रीती हे गुण! संत साहित्य अहं बाधित असल्यामुळेच काळाच्या ओघातही ते टिकून आहे. हे सर्व गुण संतांमध्ये विद्येच्या आराधनेने प्राप्त झाले.अशा सरस्वती देवीला वंदन करूनच प्रत्येक संतांनी साहित्याची सुरुवात केली, असे असताना सरस्वती देवीचे पूजन नाकारणे म्हणजे साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे असे म्हणावे लागेल. संताप्रमाणे आजच्या साहित्यिकांनी सुद्धा सरस्वती पूजन करून मराठी भाषा समृद्ध करावी त्याचप्रमाणे आपल्या सारख्या अस्सल साहित्यप्रेमींनी सरस्वती पूजन नाकारणार्या या घटनेचा निषेध करावा.