नवी दिल्ली – प्लास्टिक तसेच इतर कचऱ्यापासून समुद्रकिनारे, बीचेस मुक्त ठेवावेत त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचे महत्त्वाबद्दल जनजागरण करावे, या उददेशाने राष्ट्रीय छात्र सेनेने राष्ट्रीय पातळीवरील मोहीम हाती घेतली आहे.
पुनीत सागर या नावाची ही मोहिम 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली असून ती महिनाभर चालणार आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि बीचेस यांचे महत्त्व स्थानिक जनतेच्या व भावी पिढ्यांच्या मनावर ठसवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मोहिमेच्या 1 डिसेंबर पासून सुरू झालेल्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी विविध समुद्रकिनाऱ्यांवरील प्लास्टिक कचरा जमा करून किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेत उत्साहानं आणि स्वयंस्फूर्तीने भाग घेतला.
गल्लीबोळातील छोटे नाट्यप्रयोग, कविता वाचन इत्यादी कार्यक्रमांच्या सहाय्याने लोकांना समुद्र किनाऱ्यांचे संवर्धन आणि प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम याबद्दल माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी छात्रांनी परिश्रम घेतले. छात्रांनी हेतूपूर्वक वैयक्तिकस्तरावर संपर्क साधत स्थानिक जनतेला सागरी प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल त्यांची संवेदनशील जागी करण्याचा आणि मोहिमेला त्यांचे सहाय्य मिळवण्याचे प्रयत्नही केले. या आठवड्यात आठ सागरी प्रदेशातील राष्ट्रीय छात्र सेना महासंचालनालयांचे एकूण 30,000 छात्र या अभियानात सामील झाले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वाधिक 8255 छात्रांनी सहभाग घेतला.
पूर्व किनारपट्टी प्रभागात जवाद चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत पूर्व किनारपट्टी भागातील छात्र राष्ट्राच्या प्रति आणि पर्यावरणाच्याबाबतीत आपले नैतिक कर्तव्य बजावण्यासाठी खराब हवामान असतानाही मोहिमेत धैर्याने सामील झाले होते. या मोहिमेत छात्रांनी समुद्रकिनारे स्वच्छ करून साधारणपणे 900 किलोग्राम प्लास्टिक कचरा जमा केला. जवळपास 2 लाख लोकांपर्यंत पोहोचत त्यांच्यामध्ये स्वच्छतेचे महत्व आणि प्लास्टिक कचऱ्याच्य भस्मासुराबद्दलच्या परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या मनावर ठसवले.
या मोहिमेची समाज माध्यमांनी सविस्तर दखल घेतली. व्हॉट्सअप ट्विटर यावरून संदेशांची देवाण-घेवाण झाली. पुनीत सागर (#puneetsagar) या हॅशटॅगखाली माध्यमातून संदेश पाठवण्यात आले. या चळवळीच्या पहिल्या आठवड्यातच अनेक कार्यक्रमांनी जोर घेतला त्यामुळे अनेक शिक्षणसंस्था , स्थानिक नागरिक तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र या अभियानाशी जोडले जात आहेत.