नंदुरबार – भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाणी राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे हे आज दिनांक 19 ऑगस्ट २०२३ रोजी विशेष दौरा करून भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावरील नंदुरबार सह सर्व प्रमुख रेल्वेस्थानकांची पाहणी करणार आहेत. अमृत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास करणे आणि झालेल्या कामांची पाहणी करणे या संदर्भाने हा तपासणी दौरा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारने देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील निवडक रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी अमृत योजना हाती घेतली असून त्या अंतर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणे, प्रवाशांच्या सेवा सुविधे मध्ये आधुनिकता आणणे, अधिक सुविधा देणारे विस्तार करणे या संबंधित कामांचा समावेश करण्यात आला आहे. भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील नंदुरबार अमळनेर धरणगाव सह अन्य रेल्वे स्थानकांचा देखील त्यात समावेश आहे. अमृत महोत्सव योजनेअंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकासाठी दहा कोटी रुपयांचा अमळनेर रेल्वे स्थानकासाठी दहा कोटी रुपयांचा तर धरणगाव रेल्वे स्थानकासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता रेल्वे स्थानक विकासाच्या त्या कामांना गती देण्यात आली असून त्या नियोजित कामांचा आढावा घेणे, संबंधित रेल्वे मार्गावरील स्थितीची तपासणी करणे या अनुषंगाने रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील यांचा हा दौरा असल्याचे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 19 ऑगस्ट 2023 (शनिवार) रोजी सकाळी 9.30 वा. विशेष तपासणी ट्रेनने जळगाव-सुरत विभाग आणि सुरत रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी सुरुवात करतील. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक नवनीत अभिषेक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक याप्रसंगी त्यांच्या समवेत असणार आहे. विशेष तपासणी ट्रेनने दौरा करताना रेल्वे, कोळसा आणि खाणी राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे हे नियोजित नरडाणा जंक्शन च्या कामांविषयी तसेच मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अंतर्गत करावयाच्या धुळे नरडाणा रेल्वे लाईन विषयी देखील चर्चा करणार असल्याचे समजते.