नंदुरबार – आरोग्यमय व आनंदी जीवन जगण्यासाठी सकस व पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.त्यासाठी सेंद्रिय व जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे यासाठी कृषी विभागात कार्य करणारे अधिकारी व शेतकरी यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. तसेच कोरोना सोबत अनेक प्रकारचे रोग जन्माला आलेले आहेत व अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे पाहता रक्ताची गरज असून रक्ताचा पुरवठा वेळवर मिळाला तरच रुग्णांचे प्राण वाचू शकतात. म्हणून रक्तदान हीसुध्दा आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी सामाजिक अध्यात्मिक व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांनी स्वतःहून रक्त दान करावे; असा मोलाचा संदेश श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी दिला. श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र, चौपाळे रोड, नंदुरबार येथे आयोजित कृषी विभाग आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी हा संदेश दिला.
पुढे गुरुपुत्र आबासाहेब यांनी मार्गदर्शनात सांगितले की, वैदिक विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून शेती केल्यास पीकांमध्ये व अन्नामध्ये सात्त्विकता येते. सेंद्रिय शेतीचे महत्व,गांडूळ खताचे महत्व,परिसरात व पर्यावरणात उपलब्ध असलेल्या साधन सामग्री नुसार पारंपारिक पद्धतीने होणारी शेती पद्धत,जल संधारणाचं व बांधावरील झाडे यांचं महत्त्व, बाराबलुतेदार, मराठीअस्मिता, रानभाज्या यांचेही महत्व त्यांनी विशद केले. कृषी विभाग अंतर्गत शासनाच्या विविध योजना, जैविक शेती व अन्न, सीड बँकआदी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी नंदुरबार येथील कृषी प्रशिक्षण प्रकल्प येथील
प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन सेंद्रीय शेतीचे प्रात्यक्षिक दाखविले. कृषी विभागातील कार्याचा आढावा घेत श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र माध्यमातून नंदुरबार विभागाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक केले.
आबासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते याप्रसंगी कृषी क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. आढावा बैठकीत उत्कृष्टपणे सेंद्रिय शेती करणाऱे व सेंद्रिय शेती करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आशीर्वाद रुपी ग्र॔थभेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरना काळात श्री स्वामी समर्थ मार्गातील आरोग्य विभागातील डाॅक्टर सेवेकर्यांनी मोलाची भूमिका बजावली अशा सर्व कोरोना योद्धा डॉक्टरांचा देखील या आढावा बैठकीत सन्मान करण्यात आला. या बैठकीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात टप्प्याटप्याने 115 सेवेकरींनी रक्तदान केले. या बैठकीतकोरोनाचे सर्व शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते व गायीच्या गौऱ्या, गायीचं तुप व वेखंड पावडरचा धुर शेतकऱ्यांना देऊन परिसरात सेंद्रिय सॅनेटाइज करण्यात आले होते.
प्रास्ताविक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी श्री जीवन देवरे यांनी केले. नंदुरबार येथे दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून 18 ग्रामविभागात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा लेखी अहवाल तसेच कृषी विभागाचा माध्यमातून चालणारे प्रशिक्षण व शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून होणारे पीक, फळभाज्य, पालेभाज्यांची माहीती व प्रात्यक्षिके सादर केली.
कृषी विभागाच्या आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,नंदुरबार येथील कृषी व आरोग्य विभागातील सेवेकरींनी सहकार्य केले.