कृपया येथील प्रकाशित मजकूर कॉपी-पेस्ट करू नये
नंदुरबार – त्रिपुरा राज्यात घडलेल्या कथित घटनेला कारणीभूत वसीम रिजवी यांच्या पुस्तकावर तसेच विश्व हिंदू परिषदेवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन रझा अकादमीच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले.
लखनौचे रहिवासी आणि शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ‘मुहम्मद’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी नरसिंहानंद सरस्वस्ती यांना आमंत्रित केले होते. या प्रकाशन सोहळ्यात पैगंबरांचा अपमान करण्यात आला; असा रजा अकादमीचा आक्षेप आहे. त्रिपुरा राज्यात यावरून हिंसक घटना घडल्या.
रझा अकादमीच्या वतीने राष्ट्रपती यांना उद्देशून या विषयी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सैतान वसीम रिझवीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या पुस्तकाने संपूर्ण मुस्लिम समुदायाला धक्का दिला आहे आणि खरं तर मानवजातीवर एक डाग आहे. कारण इतिहासात कोणीही धार्मिक किंवा राजकीय व्यक्तीचा अशा भाषेत अपमान करण्याचे धाडस केलेले नाही. अनेक एफआयआर दाखल होत असताना आणि तीव्र निदर्शने होत असतानाही याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला भारत सरकार कमी पडत आहे. या सैतानाविरुद्ध ताबडतोब कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
त्रिपुरामध्ये, पवित्र प्रेषित (स.) यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याच्या कथित घटनेचा निषेध नोंदवून विहिंपवर तात्काळ बंदी घालावी, वसीम रिझवी यांच्या “मुहम्मद” या पुस्तकावर बंदी घालावी आणि सर्व प्रती त्वरित जप्त करण्यात याव्यात, वसीम रिझवी आणि नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर UAPA आणि देशद्रोहाचा कायदा लावावा, त्रिपुरा सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, त्रिपुरातील बाधित लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशाही मागण्या निवेदनात केल्या आहेत. रजा अकादमीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मोहम्मद सईद नूरी यांची त्यावर स्वाक्षरी आहे. निवेदन देताना मोहम्मद सईद नुरी, सय्यद जुबेर अहमद, मौलाना अहमद रजा, ईफ्तेखार कादरी, मुक्तकिम कुरेशी, हाजी अनिस हलवाई, हाफिज जाकीर, हाफिज तौफिक, आशिक मेमन हे उपस्थित होते. दरम्यान, दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी बंद पाळून काही भागातील मुस्लिम बांधवांनी निषेध केल्याचा दावा रजा अकादमीचे जिल्हाध्यक्ष सईद नूरी यांनी केला.