नंदुरबार – साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन संशयीतांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, दिनांक 07/07/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील बस स्थानक ते भाजीपाला मार्केट परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इको कंपनी गाडी क्र.GJ-07-DD-5109 वाहनातील 2 ते 3 बहुरुपी साधू महाराज हे लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत आहेत. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळवून एक पथक तयार करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यांच्या वाहनातून मिळाले हे साहित्य
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता महाराणा प्रताप पुतळयाजवळ 2 ते 3 साधू संशयीतरित्या उभे असल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या जवळ जावून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. तसेच ते खरोखरचे साधू नसल्याचा संशय आला, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनात बहुरूपी साधू बनण्यासाठीचे साहित्य मिळून आले.वाहनाची तपासणी केली असता वाहनात 111 खोटे रुद्राक्ष, चंदनाचा लेप असलेली ढबी, विविध प्रकारच्या रंगाचे खडे, रुद्राक्ष माळ, साधू महाराज बनण्यासाठी लागणारे कपडे, कापूर, मोबाईल, रोख रुपये व एक चारचाकी वाहन असा एकुण 5 लाख 24 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सुभानाथ शेतानाथ मदारी, वय 52 वर्षे, रा. स्टेशन रोड, हलोल, जि.पंचमहल (गोध्रा), धिरूनाथ सरकारनाथ मदारी, वय 25 वर्षे, रा. तय्यबपूरा कपडगंज, जि. खेडा, विक्रम कालू परमार, वय-25, रा. कतवारा, ता.जि. दाहोद (गुजरात) असे असल्याचे सांगितले.
बनावट साधूंचा एक गुन्हा उघड
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत इसमांच्या पध्द्तीप्रमाणे नंदुरबार जिल्हा घटकात काही गुन्हे दाखल आहे किंवा कसे ? याबाबत अधिकची पडताळणी केली असता, दि. 29/03/2022 रोजी फिर्यादी नामे दत्तात्रय कृष्णराव येवले, वय 75 वर्षे, रा. स्वामी समर्थ नगर, कोरीट रोड, नंदुरबार यांची नमूद वर्णनाच्या बहिरूप साधू महाराज यांनी हातचलाखी करून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची 45000/- रुपये किंमतीच्या 02 सोन्याच्या अंगठ्या संगनमताने फसणूक करून चोरून नेल्या होत्या. त्यावरून दिनांक 30/03/2022 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. 197/2022 भादंवि कलम 379,34 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल असल्याचे समजून आले म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही संशयीत इसमांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही संशयीत इसमांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ?याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश येलवे, पोलीस नाईक बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, पोलीस अंमलदार अनिल बड़े, प्रवीण वसावे यांच्या पथकाने केली आहे.