नंदुरबार (योगेंद्र जोशी) – एरवी रखरखीत तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणार्या नंदुरबार जिल्यातील दुर्गमभागात चक्क हिमवृष्टी झाली आणि त्या संदर्भाने ‘डाब’ हे गाव अचानक माध्यमांमधून चर्चेत आले. तथापि या डाब गावाविषयी माहित करून घ्याव्यात अशा आणखीही आश्चर्य करायला लावणार्या आणि जिज्ञासा जागवणार्या अनेक गोष्टी आहेत. हवामान विभागाच्या अभ्यासकांनी व पर्यावरण प्रेमींनी अभ्यासावे असे बरेच काही या भागात आहे. सातपुडा पायथ्याला असूनही एकमेव डाब परिसरात सागाची लागवड का होत नाही? अन्य ठिकाणांपेक्षाही डाब परिसरातच नेहमी गारवा अधिक का जाणवतो? याचा संदर्भ पुराणकाळाशी का जोडला जातो ? आदिवासींच्या देवतेशी संबंधीत कोणत्या मान्यतांना जोडून या गोष्टीकडे पाहिले जाते? डाब परीसर आता कोणत्या नव्या फळलागवडीसाठी ओळखला जाऊ लागला आहे? या अंगाने माहिती घेतल्यास आश्चर्याचा धक्का देणारी माहिती समोर येते.
नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतीदूर्गम भागातील डाब या गावी दिनांक ९ आणि १० जानेवारी २०२१ रोजी थेट ३ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरले आणि दवबिंदुंचे रुपांतर हिमकणात झालेले पहायला मिळाले. काही ठिकाणी तर चक्क वाहनांवर, वृक्षवेलींवर, गवतावर आणि भांड्यांमधील पाण्यातही बर्फाचा पातळसा थरही जमा झालेला तेथील लोकांना पहायला मिळाला. स्थानिक लोकांनी त्याचे व्हिडिओ आणि अनेक छायाचित्रेही प्रसारित केली. संपूर्ण खानदेशातील या एकमेव ठिकाणी असे आढळत असल्याने ही मोठी आश्चर्याचा धक्का देणारी घटना मानली जात आहे. डाब येथे घडलेली ही मागील पाच वर्षातील दुसरी घटना आहे. आज दि.११ जानेवारी रोजी मात्र लगेचच तो गोठवून टाकणारा गारवा कमी झाला तेथील तापमान ९ अंश पर्यंत वाढले. पुढेेही हे तापमान वाढत राहिल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
हे आहे शास्त्रीय कारण
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातले थंड हवेचे दुसर्या क्रमांकाचे ठिकाण म्हटले जाते. ते याच डोंगर रांगेत आहे. नंदुरबार जिल्ह्यात कमालीची थंडी वाढते त्या-त्यावेळी तोरणमाळ परिसरातही दवबिंदू गोठल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले आहे. तोरणमाळ हे समुद्रसपाटीपासून उंचावर असून डाब पासून बरेच लांब आहे. परंतु तरीही तुलनेने तोरणमाळपेक्षा डाबचे हवामान उन्हाळ्यातसुध्दा अधिक थंड असते. आताच्या गोठवणाऱ्या थंडीने त्यात भर घातली एवढेच. भारतीय हवामान विभागाचे नंदुरबार येथील तज्ञ सचिन फड यांनी डाबमधील हिमकणांचे शास्त्रीय कारण विषद करतांना सांगितले की, धुळ्यात नुकतीच झालेली गारपीट, नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच जोरदार वाहणारे गारठणक वारे या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन डाब परिसरात तापमान घटून अधिक गारठा निर्माण झाला व हिमकण निर्माण झाले. वातावरणीय बदल टिपणारे साधनसाहित्य त्या भागात नसल्याने तंतोतंत माहिती मिळत नाही. तथापि नंदुरबार जिल्ह्यात जेवढे तापमान नोंद होते त्याच्यापेक्षा किमान तीन अंशाने डाब परिसरातील तापमान कमी असल्याचे आम्ही गृहीत धरतो; असेही सचिन फड यांनी सांगितले.
विशेष असे की, तापमान सांगणार्या वेगवेगळ्या वेबसाईटस् ऑनलाईन सर्च केल्यास अक्कलकुवा तालुक्याचे कमाल आणि किमान तापमान वेगवेगळे पहायला मिळते. डाब या गावातील घसरलेल्या तापमानाची त्यात कुठेही नोंद मिळत नाही. कारण हा दुर्गम भाग असल्याने तेथील वातावरणीय बदलाच्या नोंदी साधनांद्वारे शक्य होत नसावे.
डाबमधील गारव्याचे संदर्भ पुराणात ?
दरम्यान, ईतर ठिकाणांपेक्षा डाब परिसरातच अधिक गारवा जाणवण्याचे कारण काय? डाबमधे काही वातावरणीय बदल अचानक घडताहेत का? हवामान अभ्यासकांनी लक्ष घालावे असे अदभूत काही सातपुडा पायथ्याशी घडते आहे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु असे काहीही नसल्याचे स्थानिक आदिवासी ग्रामस्थांना वाटते. डाब परिसराला गार वातावरणाचे वैशिष्टय आताच्या वातावरणीय बदलामुळे नव्हे तर पुराणकाळापासून लाभलेले आहे; अशी समस्त आदिवासींची मान्यता आहे. त्यामुळे काल तापमान घटून हिमकण बनल्याचे आश्चर्य त्यांना वाटत नाही.
डाब परिसर पुराण काळातील पवित्र ठिकाणांपैकी एक आहे, असे समस्त आदिवासी समाज मानतो. त्यांचे म्हणणे आहे की, देवाचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी नेहमीच गारवा असतो. या भागात आदिवासींची कुलदेवी श्री याहामोगी मातेचे वास्तव्य आहे आणि म्हणूनच सर्व ऋतूंमध्ये जिल्ह्यातील किंवा अक्कलकुवातील अन्य कोणत्याही ठिकाणापेक्षा या संपूर्ण डाब भागात अधिक गारवा जाणवतो. अक्कलकुवापासून १२ किमी अंतरावर डोंगराळ घाट रस्त्याने डाबकडे जातांना देवगोई येथे देवीचे मंदिर लागते. हे जागृत देवस्थान मानले जाते. या मंदिरापासून डाबकडे पुढे जातांना भर उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव येतो.
आदिवासी जीवन आणि संस्कृतीचा गाढा अभ्यास असलेले डॉ.कांतिलाल टाटीया यांनी सांगितले की, डाब परिसरातील गारव्याचे वैशिष्ट्य ईतिहासपूर्व काळापासून असावे असे म्हणता येईल. कारण त्याचे संदर्भ आदिवासींच्या पुरातन लोकगीतातही मिळतात. “हेलो डाबो मालेरा, हेला हेलो लागेरा”; असे त्या गिताचे बोल आहेत. डाब हे खुप थंड ठिकाण असल्याचा अर्थ आणि माहिती त्यातून मिळते, असे डॉ.टाटीया म्हणाले. हे संदर्भ लक्षात घेता डाब परिसरात वातावरणीय बदलामुळे वरचेवर विचित्र बदल घडले आणि अचानक गारठा निर्माण झाला; असे म्हणता येत नाही. तथापि या छोट्याशा एकमेव परिसरातच वेगळे वातावरण कशामुळे रहाते? असे कोणते नैसर्गिक घटक या ठिकाणी कारणीभूत असावेत? याचा शोध पर्यावरण व हवामानविषयक अभ्यासकांनी घ्यायला हवा. असे बरेच काही येथे आहे, एवढे नक्की.
डाब परिसरात सागाचे झाड उगवत नाही?
डाबचे आणखी एक वैशिष्ट्य असेही सांगतात की, या भागात कुठेही सागाची झाडे आढळत नाहित. डाबगावासह छोटा परिसर असा आहे की तिथे साग उगवत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आदिवासी समाज संघटनेचे नेते तथा राजकीय ज्येष्ठ कार्यकर्ते आमशा पाडवी यांनी सांगितले की, देवी याहामोगी माता आणि राजा पानठा यांच्या दंतकथेत याचे संदर्भ सापडतात. श्री याहामोगी देवीवर याठिकाणी संकट ओढवले होते व येथील सागाची पाने कारणीभूत ठरली होती. म्हणून संतापलेल्या राजा पानठा यांनी तेथील साग उपटून फेकले परिणामी तेव्हापासून अद्याप एवढ्या परिसरात साग लागवड केली जात नाही, असे आमशा पाडवी म्हणाले. डाबनजीकच्या खाईमधे अनेक वर्षांपूर्वीची दोन सागाची झाडे आहेत. ते एकमेव अपवाद आहेत. ते दोन्ही विशाल साग तत्कालिन पुरातन काळातले असल्याचा आदिवासी बांधवांचा दावा आहे. तथापि संपूर्ण सातपुडा रांग आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गाव-पाडे साग झाडांचे वैशिष्टय जपून असतांना एकमेव हा परिसर सागाविना कसा काय राहिला? हा देखील कृषी अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय आहे.
स्ट्रॉबेरी लागवड देतेय डाब परीसराला नवी ओळख
डाबचे आणखी वैशिष्ट्य असे की, या भागात आता स्ट्रॉबेरीची शेती चांगलीच फोफावत चालली आहे. खानदेशात एरवी कापूस, मिरची,ऊस, पपईचे अमाप पीक घेतले जाते. अक्कलकुवा, धडगाव तालुका पूर्वीपासून आंबे, कैर्या, सिताफळ व अन्य काही पारंपारिक पिकांसाठी प्रसिध्द आहे. तथापि स्ट्रॉबेरी हा प्रकार नवीन होता. असे असतांना आठ दहा वर्षांपूर्वी प्रायोगिक स्तरावर तोरणमाळ आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रयोग करण्यात आला. आता डाब परिसरातील अनेक आदिवासी बांधव स्ट्रॉबेरी पिकवण्यात आघाडीवर आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादन नजीकच्या काळात येथील खास वैशिष्ट्य बनलेले दिसेल, असे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे. कृषी संशोधक, हवामान तज्ञ यांनी संशोधन करावे असे आणखी येथे बरेच काही असावे हे नक्की.