नंदुरबार – अँटी करप्शनवाले इतक्या जणांना पकडतात परंतु पुढे काय घडते ? कोणाला शिक्षा होताना तर दिसत नाही ? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. त्याचे वेळेवर खुलासेवार उत्तर संबंधितांकडून मिळत नाही हे पण एक वास्तव आहे. तथापि काही प्रकरण तडीस नेले जातात हे देखील सत्य असून नंदुरबार अँटी करप्शन ब्युरो ने नुकतीच दिलेली माहिती या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.
या माहितीत म्हटलं आहे की, ॲन्टी करप्शन ब्युरोकडील दाखल गुन्हयात मागील सात महिन्यांत सलग तिसरी दोषसिदी झाली असून आतापर्यंत एकूण 4 आरोपीना सक्षम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. कंटेनर ट्रक गव्हाळी सीमा तपासणी पोस्टमार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी 4 हजारा रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक म्हणजे आरटीओ विभागातील निरीक्षकांस व सहाय्यक रोखपाल यांना पाच हजार रुपयांच्या दंडासहित दोन वर्ष कैदेची शिक्षा शहादा न्यायालयाने नुकतीच सुनावली आहे. त्याचाही यात समावेश आहे.
परंतु अँटी करप्शन ब्युरो ने पकडून गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या जवळपास 12 आहे. अँटी करप्शन ब्युरो च्या कारवाईत दोषी आढळलेल्यांना शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण वाढावे आणि भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांना धडा मिळावा ही जनतेची अपेक्षा आहे.
या संदर्भाने दिलेल्या माहिती पुढे म्हटले आहे की, कोणताही सरकारी नोकर, निमशासकीय नोकर किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी एजेंट जो सरकारी काम करुन देण्याचे मोबदल्यात कोणाही नागरीकांकडून लाच अथवा बक्षिसाची मागणी करतो, अशा सरकारी नोकराची किंवा त्यांचे वतीने काम करून देतो सांगणाऱ्या खाजगी इसमाची अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यास अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत लाचेचा सापळा कार्यवाही करुन त्यांचेवर अष्टाचार प्रतिबंध कायदयातील नमूद तरतुदीन्वये गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर संबधित आरोपी लोकसेवक अथवा खाजगी इसमांविरुद् न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला चालविला जातो. तसेच संबंधित आरोपीतांविरुद्ध न्यायालयात खटला चालू असतांना सरकारी वकिलांमार्फत युक्तीवाद होवून आरोपीतांविरुध्द् दोषसिध्दी होणेसाठी प्रयत्न केला जातो, तसेच पैरवी अधिकारी / अंमलदार यांचेमार्फत देखील नमुद गुन्हयांत दोषसिध्दी होणेसाठी पाठपुरावा केला जातो.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार युनिटकडील खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील स्वर्णसिंग गिरासे यांनी कौशल्यपूर्वक व अतिशय मेहनतीने दोषसिध्दी होण्याचे दृष्टीने सरकारी पक्षाची बाजू मांडून अति. सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय, शहादा येथील जिल्हा न्यायाधीश सी.एस. दातीर यांचे न्यायालयाने साक्षी व पुराव्यांचे आधारे नोव्हेंबर- 2022 या महिन्यात 1 तसेच जानेवारी 2023 या महिन्यात 1 जुन- 2023 या महिन्यात 01 अशा एकूण 3 खटल्यांत लाचेच्या गुन्हयात व दोषसिध्दी दिलेली आहे. तसेच एकूण 4 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावलेल्या आहेत.
याव्दारे अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार तर्फे नंदुरबार जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यांत येत आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार येथील पोलीस उप अधिक्षक राकेश आ. चौधरी मो.नं. 9823319220, पोलीस निरीक्षक श्री समाधान वाघ मो. नं. 8888805100, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी वाघ मो.नं. 8888813731 तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्र. ( 02564) 230009 व टोल फी क्र. 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन राकेश आ. चौधरी, पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केले आहे.