हे चाललंय काय? नंदुरबारच्या कृत्रिम पाणीटंचाई मागचे खरे कारण काय?

नंदुरबार – पावसाने कितीही ताण दिला तरीही शहराला पुरेसे पाणी पुरेल इतका म्हणजे विरचक प्रकल्पात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे असे असताना लागोपाठ पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत असून शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट झेलावे लागले आहे. नंदुरबार शहराच्या बहुतांश भागातील लोकांना विकतचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे आणि ते विकतच पाणी मिळत नाही म्हणून वणवण भटकण्याची वेळ काही जणांवर आली आहे. अशा घटना अचानक घडण्यामागे राजकारण काय? असा प्रश्न आता नागरिकांमधून केला जात आहे.
नंदुरबार पालिकेतील राजकीय सत्ताधाऱ्यांच्या काळात जे घडले नाही ते आता प्रशासक असताना घडत आहे. पाईप फुटण्याचे प्रकार अथवा बिघाड होण्याचे प्रकार निसर्गतः घडत आहेत की घडविले जात आहेत? ही शंका एका पाठोपाठ घटना घडत असल्यामुळे उपस्थित होते आहे. रोज गाळ आणि शेवाळ मिश्रित अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जलशुद्धीकरणासाठी लागणारी औषधे वापरले जात नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
  नवनियुक्त आयएएस अधिकारी पुलकित सिंह यांनी तहसीलदार पदाचा पदभार हाती घेतल्याबरोबर जी कारवाई सुरू केली तेव्हापासून पाणी टंचाई ची ओरड सुरू झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुलकित सिंह यांना नंदुरबार तालुक्यातील व नंदुरबार शहरातील अनेक खाजगी वॉटर फिल्टर धारक वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले होते. भूगर्भातुन पाणी काढुन व्यवसाय करण्याने पाण्याचा स्त्रोत कमी होऊन पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कार्यरत असलेले वॉटर फिल्टर धारक आवश्यक ते परवाने न घेता केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत आहेत; यासारखी कारणे देऊन पुलकित सिंह यांनी कारवाई केली होती. वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकांना  CGWA केंद्रीय भूजल प्राधिकरण व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडेस ऑनलाईन आवेदन करून रितसर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक असते. तश्याप्रकारची कोणतीही परवानगी नाहरकत दाखले घेतलेले नसल्याची बाब निदर्शनास आलेली होती. या लोकांनी संबंधीत यंत्रणेची/ विभागाची रितसर परवानगी घेऊन नाहरकत दाखले प्राप्त करुन घ्यावेत. तसेच आवश्यक शुल्क त्यांचेकडेस ऑनलाईन प्रक्रियेने जमा करावे असेही सूचित केले होते.
तसेच नंदुरबार शहरातील अवैध बोअर वेल वापर करणा-या 7 आस्थापनांवर कार्यवाही करण्यात आली होती. या कारवाईमुळे पाणी व्यवसाय करणारे बरेच जण दुखावले. त्यानंतर अनेक भागात टँकरने पाणी मिळणे बंद झाले काही भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणे सुरू झाले. त्यापाठोपाठ शहरातील पाईपलाईन फुटणे आणि पाणीटंचाई निर्माण होणे हा खेळ खंडोबा सुरू झाला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे काय? अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कारण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पात सद्यस्थितीत ४२ टक्के पाणीसाठा आहे. पाऊस लांबला तरी पाणी टंचाईची कुठलीही आफत येणार नाही इतका हा पाणी साठा आहे. नागरिक त्यामुळे निर्धास्त होते. परंतु पाइपलाइन फुटण्याच्या घटना एकापाठोपाठ घडत असल्यामुळे सर्वचजण हादरले आहेत. त्या माध्यमातून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अप्रत्यक्षपणे घडवला जात आहे.
१५ दिवसांपूर्वी साक्रीनाका भागात पाइपलाइन फुटली होती. ती दुरुस्त करण्यासाठी तब्बल सहा दिवस लागले होते. या काळात ४० टक्के भागातील पाणीपुरवठा ठप्प होता. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता बूस्टरपंपनजीक व्हॉल्व्ह खराब झाल्याने आणि वळण रस्त्यावरील गोकुळधाम सोसायटीजवळ पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे टेलिफोन कॉलनी, शारदानगर, सरस्वती नगर, वर्धमान नगर, शांतीनगर, भोणे फाटा, ज्ञानदीप सोसायटी, गोपाळनगर, मधुबन सोसायटी, गाझीनगर, राजीव गांधी नगर, गांधीनगर, जयंतीलालनगर, रामनगर, हरिभाऊनगर, सोनाबाईनगर, अनिलनगर, शहाबाईनगर, कामनाथ मंदिर परिसर, देसाईपुरा परदेशीपुरा, रायसिंगपुरा, शिवाजी कॉलनी, लोकमान्य कॉलनी, मेघनगर, पटेल वाडी, बादशहानगर, स्वामी समर्थ नगर या भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!