११ ऑक्टोबर २०२१ पासून शनिदेव पुन्हा मार्गी होत आहेत. त्याच बरोबर १८ ऑक्टोबर २०२१ रोजी देवगुरु बृहस्पती देखील मार्गी होत आहेत. ग्रहांचे हे परिवर्तन अनेक अंगाने मुनष्य जीवनावर परिणाम घडवते असे ज्योतिष शास्त्र सांगते. ज्योतिषशास्त्राचे जाणकार श्री.वैभव व्यास यांनी शास्त्राच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार काही राशींना हे ग्रह परिवर्तन अत्यंत लाभदायी ठरणार आहे तर काही राशींना खास करून साडेसाती व ढईया चालू असलेल्यांना दक्षतेने चालण्याची सूचना देणारे संकेत देणारे ग्रहमान आहे. व्यास यांनी म्हटले आहे की, २३ मे २०२१ रोजी शनिदेव वक्री झाले होते. आता पुन्हा मार्गस्थ होऊन मकर राशीत शनिदेव राहतील. पुढे २९ एप्रिल २०२३ रोजी ते कुंभ राशीत जातील. ती स्थिती निराळी राहिल. परंतु विद्यमान स्थितीत हे महत्वाचे आहे की, चालू ऑक्टोबर महिन्यातच देवगुरु म्हणजे बृहस्पती देखील मार्गी होत परिवर्तन करीत आहेत. फलाफलच्या दृष्टीकोनातून काही संकेत देणारी स्थिती यातून समोर आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी शनिदेव श्रवण नक्षत्रावर मार्गी होणार आहेत तर १८ ऑक्टोबर रोजी धनिष्ठा नक्षत्रावर मार्गी होत आहेत. दोन्ही ग्रह मकर राशीत २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मार्गी चालत राहतील. ग्रह मार्गी होतो, याचा अर्थ असा की, ग्रह आपल्या मूळ मार्गावर परत येत असतो आणि फलाफलच्या दृष्टीने त्याचा सरळ थेट संपर्क स्थापित होत असतो. ग्रह सतत भ्रमणशील असतात तर नक्षत्र हे अस्थिर असतात. ग्रह त्यांचाच आधार घेत भ्रमण करत असतात. शनिदेव हे मंद गतीने चालणारे ग्रह आहेत. म्हणून शनिवारला मंदवासरे असेही म्हणतात. मनी ठाणलेल्या ध्येयाकडे नेणारे कार्य सतत करत राहिले तर जीवनाचा पाया आपोआप घातला जातो. त्यातून आपोआप व्यक्तीचे व्यक्तीमत्व घडत जाते. ११ ऑक्टोबर पासून दोन ग्रहांचे होणारे मार्गी भ्रमण मेष राशीपासून मीन राशी पर्यंतच्या सर्व जातकांना विविध प्रकारचे फलाफल देणारी स्थिती बनू शकते. खासकरून जर हेही विचारात घेण्याची आवश्यकता आहे की, जर चंद्र प्रमुख नक्षत्र आधार असेल आणि देवगुरु बृहस्पती निचस्थ दृष्टीने राशीला पहात असतील किंवा सातव्या स्थानावरील उच्चदृष्टीने पहात असतील तर शनिदेवांच्या प्रभावक्षेत्रात गणल्या जाणार्या प्रत्येक क्षेत्रविशेषवर जे परिणाम घडतील ते जाणून घेण्याची आवश्यकता राहिल. जो जातक म्हणजे व्यक्ती साडे साती अथवा ढईया अंतर्गत असेल त्या प्रत्येकाला या कालावधीत हनुमंताची साधना, पुजाअर्चा, नामजप आवश्यक असते. अशा काळात काही जणांकडून भ्रमात टाकणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते. म्हणून त्याबाबत सावधगिरी ठेवून चालणे उचित ठरू शकते. आता पाहू या शनिदेवांच्या मार्गी होण्याचे राशीनिहाय संभाव्य परिणाम:
मेष :
दशम भावातले शनिदेव या राशीतील लोकांची धावपळ वाढवू शकतात. देवगुरु बृहस्पती सोबत आहेत, परंतु येत्या १८ ऑक्टोबरपासून ते निचस्थ आधारावर राहतील म्हणून पक्की खात्री असेल त्याच निर्णयावर अंमल करणे योग्य ठरेल. व्यवसायानिमित्त करावी लागणारी धावपळ मानसिक, व्यावसायिक सुख, आनंद देणारी असू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबीत बांधकाम, किंवा स्थिरता देणारे पायाभूत कार्य या अनुषंगाने दशमभावातील शनिदेव मार्गी झाल्यानंतर सफलता मिळायला प्रारंभ होऊ शकतो. परंतु त्याचवेळी जीवनप्रबंधाशी संबंधीत काही तरी कमतरता राखणारी स्थिती उदभवू शकते. मात्र एप्रिल २०२२ पर्यंतच्या काळात आपल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे पहायला मिळू शकते. अहंकार, प्रतिष्ठा-प्रतिमा जपण्याचा भाग बाजूला ठेवाल, काढून टाकाल तर यश व्यापक आणि स्थिर राहू शकते. अनावश्य खर्चाचे प्रसंग पडू शकतात. मंगळप्रधान राशीच्या लोकांनी लक्षात घ्यावे की, चंद्रमा नक्षत्राच्या आधारावर शनिदेव जर मार्गी होत आहेत तर, दीर्घकाळापासून अटकलेले प्रश्न-निर्णय मार्गी लागणार असले तरी ही आपल्याला मिळालेली मोठी संधी मानून ती गमवली जाणार नाही, या अर्थाने सावध रहा.
वृषभ:
शुक्रप्रधान वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवांचे मार्गी होणे नवमभावाबरोबरच लाभ आणि पराक्रमभावाच्या स्तरावर देखील शनिदेवांची दृष्टी रहाणार आहे. ही स्थिती अध्यात्मिक स्तर वाढवणारी आणि लांबच्या दृष्टीकोनातून जे निर्णय घेणे आवश्यक असते त्या स्थिरता देणारी स्थिती बनणार आहे. नोकरी व्यवसायात जी नकारात्मक स्थिती होती तसेच तुम्ही स्वत: दुर्लक्षीत करूनही काही लोक तुमच्यावर प्रभाव गाजवू पहात होते, वर्चस्व गाजवून तुम्हाला खाली पहायला लावण्याच्या प्रयत्नात होते; ते सर्व हळूहळू संपवणारी स्थिती बनण्याचे योग दिसत आहेत. परिवारातील लहान-सहान वादापासून मात्र स्वत:ला दूर ठेवा. यश आणि लाभ मिळू लागताच मनातील अहंकार आणि मी पणा वाढू लागतो, शिवाय मनात नकारात्मक भाव वाढू लागतात, अशावेळी आपले हित कशात आहे ते पाहून वागण्याचा निर्णय तुमचा तुम्हीच केला पाहिजे. आयटी क्षेत्रात दीर्घकाळापासून चालणार्या व्यक्तींना अपडेट होण्याचे संकेत देणारे ग्रहमान आहे. अपेक्षीत चैतन्य निर्माण होत नाही म्हणून पर्यायी आणखी वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाच्या दिशेने कार्यरत होऊन मनातील संकल्पशक्ती वाढवण्याची गरज सांगणारी आणि त्यातूनच पुढे तुम्ही प्रभावी बनणार असल्याचे दर्शवणारी ग्रहस्थिती आहे. मात्र त्याचवेळी वायूविकाराने त्रस्त होणार नाहित यादृष्टने सावध राहण्याचीही आवश्यकता आहे. देवगुरु बृहस्पती १८ ऑक्टोबर नंतर मार्गी होताच आपली प्रलंबीत राहिलेली बढतीसंबंधीत प्रकरणे मार्गी लागू शकतात.
मिथून:
मिथून राशीतील जातकांचा साडे सातीसारखाच त्रासदायक वाटणारा ढईयाचा काळ चालू असल्याने त्यांना ११ ऑक्टोबर नंतर शनिदेव मार्गी झाल्यावर अधिक सावध आणि स्थिर राहण्याची गरज आहे. दुसर्यांनी आपल्यावर निर्णय थोपलेले असल्यास थंड रहा, यातच आपल्या जीवनाचे हीत राहिल. कारण १८ ऑक्टोबर रोजी देवगुरु बृहस्पतींचे मार्गी होत असून ते ५ व्या स्थानावरून द्वादशभाव पहाणारी दृष्टी ठेऊन असणार आहेत आणि शनिदेव अष्टमेष बनून अष्टम भावात राहणार आहेत. ढईया असली तरी हा काळ आपल्या परराज्यातील अथवा परदेशातील कामांना गती देणारा असेल. वाणी संबंधीत कामात धिमापन आवश्यक राहिल. अनुभव तुम्हाला अधिक सुखीसमाधानी बनवतील. दगा, फसवणूक झाली तरी लोक परखण्यासंदर्भाने मोठ्या गोष्टी शिकून पुढे सरकाल. आपले कर्म आपल्याला समाधान आनंद देतील.
कर्क:
कर्क राशीच्या जातकांना १८ ऑक्टोबर पर्यंत घरगृहस्तीच्या स्तरावर अधिक सांभाळून चालण्याची आवश्यता राहिल. दोन ग्रह सप्तम भावात असल्याने जस्टीफिकेशन वगैरे शब्द सुध्दा बाजूला ठेवावे. परंतु १८ ऑक्टोबर नंतर देवगुरु मार्गी होताच आपला आत्मविश्वास प्रचंड वाढवणारी स्थिती बनणार आहे. भावूक नसाल तथापि महत्वाच्या व्यक्ती समवेत मनमुटाव होणार नाही याविषयी दक्ष रहावे लागेल. शनिदेव मार्गी होताच बांधकामसंबंधीत, रिअल इस्टेट संबंधित, शैक्षणिक क्षेत्रासंबंधीत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले पायाभूत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुन्हा तुम्ही त्यात कार्यप्रवण झालेले दिसाल. का झाले, कसे झाले, कोणामुळे अपूर्ण राहिले, वगैरे प्रश्नांचा भूतकाळ विसरून पुढे चालायचे असते आणि असे वागणार्यांना प्रगतीच्या वाटेवर न थांबता चालायला मिळते. तेच तुमच्याबाबत घडू शकते. अँझॉईटी सारखे त्रास काही जणांना जाणवू शकतात.
सिंह:
देवगुरु बृहस्पतींचे १८ ऑक्टोबर रोजी मार्गी होणे सिंह राशीच्या जातकांना प्रकृतीच्या दृष्टीने सावधानतेचा इषारा देणारे आहे. पचन आदी संबंधीत आजाराने आधीपासून त्रस्त असलेल्यांना खानपानाबाबत संयम आणि शिस्त आवश्यक राहिल किंबहुना बदल करावे लागतील. निर्यात संबंधी कामात वाढ होऊन यश मिळेल. शत्रू हावी होणार नाहित असे कर्म करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. अन्यथा शष्टभावातील शनिदेव प्रखर स्थिती समोर आणू शकतात. तथापि आपल्या पराक्रमातसुध्दा वाढ होत राहिल.
कन्या:
या राशीतील जे जातक व्यक्ती अर्थकारणसंबंधीत, शिक्षणसंबंधीत अथवा तत्सम क्षेत्रात असतील किंवा त्या संबधीत शिक्षण घेत असतील त्यांना दोन्ही ग्रह मार्गी होताच आतापर्यंत चालत आलेल्या निराशा संपवणारी आणि यश देणारी स्थिती बनू शकते. मित्रांच्या सहकार्याने सोबतीने सुरु केलेल्या व्यवसायात मोठ्या यशाची अपेक्षा न करता काही काळ प्रतिक्षा करणे हिताचे ठरू शकते. काही मिळत नाही असे वाटते म्हणून लगेच कोणत्या नोकरीचा विचार करायचा; असे झटपट न करता विचारपूर्वक निर्णय करणे आवश्यक राहिल. स्वस्थिरता हीच खरी शक्ती हे या काळात ध्यानी घेणे आवश्यक राहिल.
तुला:
निवासस्थानी कामधंदा-व्यवसाय सुरु करू पहात असाल तर या राशीतील व्यक्तींनी मार्गी होणार्या ग्रहमानाचे परिणाम आधी ध्यानी घ्यावे. नोकरीपेशातही या व्यक्तींसाठी आश्वस्त करणारी स्थिरता निश्चिंतता दूरपर्यंत दिसत नाही. निश्चिंत राहून चालता येणार नाही हे ध्यानी घेऊनच किमान वर्षभर चालायचे आहे. जीवनप्रबंधनात बाधा राहिल, २० नाव्हेंबर पर्यंत घरातील मातासमान ज्येष्ठांच्या प्रकृतीचा प्रश्न उभा राहू शकतो. बांधकाम, रिअलइस्टेट, ऑईल आदी संबंधीत जातकांना अधिक काळजीपूर्वक निर्णय करावे लागतील कारण यांचीही ढईया चालू आहे.
वृश्चिक:
या राशीतील ज्या व्यक्ती नोकरीपेशात दीर्घकाळापासून अस्थिरता अनुभवत होते त्यांना आता स्थिरता आणि नवीन काही करण्याची उमेद अनुभवायला येऊ शकते. यात्रा, प्रवासापासून दूर राहणार्यांनी आता धाडस करावे असे ग्रहमान बनत असून त्यांच्या संपर्काला यश मिळतांना दिसेल. मगळप्रधान राशीच्या जातकांना तर एप्रिल २०२२ पर्यंत प्रगती आणि स्थिरता देणारे ग्रहमान आहे. अर्थात व्यक्ती कुंडलीतील ग्रहमान व्यक्तीपरत्वे काही प्रमाणात वेगवेगळे परिणाम दर्शवू शकते. जीवनातील सफलता म्हणावी अशा गोष्टी साध्य होवू शकतात. भावा बहिणींचे संबंध जपण्याची सुध्दा या काळात आवश्यकता राहिल.
धनू:
या राशीतील व्यक्तींना साडेसाती असून अंतिम टप्पा चालू आहे. अशात होणारे देवगुरु बृहस्पतींचे आणि शनिदेवाचे मार्गी भ्रमण कार्यसफलतेचे आणि मनाला सुदृढ बनवणार्या घटनांचे संकेत देत आहे. आतापर्यंत या राशीच्या व्यक्तींनी असे काही अनुभव घेतले की, ज्यामुळे जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अधिक गंभीर बनला असावा. कर्माचे महत्व, नैतिकतेचे महत्व, ईश्वरप्राप्तीचे महत्व जाणवून देणारा घटनाक्रम ज्यांचा अनुभवून झाला अशा जातकांना आता पुढचा जीवन प्रवास एका वेगळ्या प्रवाहाच्या दिशेने होऊ लागल्याचे अनुभवायला मिळू शकते. वाणीमध्ये, शब्दामधे जर गांभिर्य आणि तात्विकशक्ती अवलंबली तर कामकाजात यश निश्चित आहे. जिथून अनुभव मिळाले तिथूनच काम मार्गी लागेल. पारिवारिक सदस्यांविषयी परस्पर मत बनवण्यापासून, निष्कर्ष काढण्यापासून मात्र सावध राहण्याची अधिक आवश्यकता राहिल. मिळणार्या यशामुळे फुलून जात भ्रमित होण्याऐवजी अधिक धैर्याने वागणे अपेक्षित आणि उचित राहिल. जमीनप्रकरणात मोठे निर्णय समोर येतील व काही तडजोडी कराव्या लागू शकतात.
मकर:
या राशीतील व्यक्तींची साडेसाती मध्यावर आहे. अशातच चंद्रमा नक्षत्रावर शनिदेव मार्गी होताहेत म्हटल्यावर या व्यक्तींचे मन वारंवार परिवर्तन घडवायला उद्यूक्त होईल. हे करू, ते करू, हा निर्णय असा बदलवू, अमूक व्यक्तीसोबतचे संबंध बदलवू , याला असे उत्तर देऊ, त्याला तसे करून टाकू अशा खुपकाही विविध विचारजाळ्यात मन गुरफटलेले राहिल. योगसाधना करून मन स्थिर करणे, रोज सकाळी सूर्योपासना करीत शनिगायत्रीची उपासना करणे, हनुमान उपासना करून अंतर्मन स्वच्छ सशक्त बनवणे हाच यावर उपाय होऊ शकतो. काय बरोबर, काय कमी बरोबर याच्यातील अंतर कळाले की, जीवनाची स्पष्टता समोर येते. घरच्या बाहेरच्या लोकांशी अहंकाराने वागणे थांबवले तर सुलभता अनुभवता येईल.
कुंभ:
या राशीच्या व्यक्तींना साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे. यामुळे कोणत्याही स्थितीला सामोरे जातांना स्थिर रहाणे या व्यक्तींना आवश्यक आहे. नवे स्टार्टअप आकर्षित करतेय, कोणी चांगली ऑफर करतंय, व्यापारात वाटतंय की हे बदलवून अन्य काही करावे, तर एका रुपयाचे दोन रुपये बनतील या भ्रमात राहून निर्णय घेऊ नये. बदल नव्हे तर आहे त्या जागी राहण्याची स्थिरता महत्वाची आहे. अंतर्मनाचा आवाज ऐका. निर्णयातील सकारात्मकता तपासून पहा. शत्रू हावी होवू न देता शत्रूचे आणि निंदकांचेही म्हणणे ध्यानी घेणे हिताचे ठरेल. हनुमान उपासना सहाय्यभूत होऊ शकते.
मीन:
दोन्ही ग्रहांचे मार्गी परिवर्तन होणे या राशीच्या व्यक्तींना लाभदायी ठरू शकते. शेअर मार्केट कामात स्थिरता आणि प्रगती लाभेल. शनिदेवांच्या कृपेमुळे संशोधनात्मक काम करणार्यांनाही यश लाभेल. काही जातकांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांच्यातील क्षमतांचा परिचय मोठ्या स्तरावर होईल. लहान सहान अडचणी समस्यांमधून जीवन मुक्त करू पहाणार्यांना मोठे समाधान लाभेल. लेखन, भुमिसंबंधीत प्रलंबित काम मार्गी लागेल.