जळगाव – प्रवासी बस हस्तांतर करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेतांना दोन आरटीओ एजंट रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात ‘एजंट राज’ कसे झोकात चालते, यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. भारताचे सडक परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा गर्जना करून देखील आरटीओ कार्यालयात समांतर कारभार चालवणारे एजंट राज संपुष्टात आणण्याचे प्रयत्न झालेले नाही, जळगाव येथील ताज्या प्रकरणाने अधोरेखित केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी एक प्रवासी बस विकत घेतली होती. ती बस तक्रारदार यांना वडिलांच्या नावे हस्तांतरीत करायची होती. म्हणून ते जळगाव येथील आरटीओ कार्यालयाच्या संपर्कात होते. आवश्यक ते कागदपत्र दिल्यानंतर या आरटीओ कार्यालयातील एजंट यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने 10 हजार रुपयांची मागणी केली. म्हणून बस मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डी वाय एस पी शशिकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी आरटीओ कार्यालयात सापळा लावला असता रक्कम स्वीकारताना एजंट शुभम राजेंद्र चौधरी (वय-२३) आणि दुसरा एजंट राम भिमराव पाटील (वय ३७) हे जळगावच्या आरटीओ कार्यालय आवारात स्विकारताना रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.