नंदुरबार – विविध क्षेत्रात देशस्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या थोर महिलांचे पुतळे येथील नगरपालिकेने नव्यानेच उभारलेल्या मां बेटी उद्यानात बसविण्यात आले असून येथे येणार्या प्रत्येक महिलेला हे ऊद्यान प्रेरणा आणि ऊर्जा मिळवून देणारे ठरेल; असा विश्वास या उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने नुकतेच उभारण्यात आलेल्या या माँ बेटीउद्यानाचे खास वैशिष्ट्य असे की, हे उद्यान फक्त महिलांसाठी असून देशभरात आदराने ज्यांचे नाव घेतले जाते अशा महिलेचे म्हणजे स्वर्गीय मीनाताईंचे नाव त्याला देण्यात आले आहे. शिवाय या उद्यानात देशस्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचेच पुतळे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर आणखी वैशिष्ट्य असे की उद्घाटन प्रसंगी फक्त महिला मान्यवर पदाधिकारीच मानकरी म्हणून अग्रस्थानी होत्या.
नंदुरबार नगर पालिकेने महिलांसाठी स्वतंत्र असे अद्ययावत मा बेटी उद्यान बनविले तसे यापूर्वी फक्त महिलांसाठी जिम देखील सुरू केली आहे. पंचवार्षिक निवडणूक प्रसंगी दिलेल्या पैकी ही एक वचनपूर्ती असल्याचे शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांनी म्हटले आहे.
नंदुरबार येथील नगरपालिकेतर्फे नव्याने बनविण्यात आलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे माँ बेटीउद्यानाचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाॲड. सीमा वळवी होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्षा तथा नगरसेविका शोभाताई मोरे, इंदिरा महिला बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. साक्री येथील आमदार मंजुळाताई गावित यांनी व अन्य मान्यवरांनी फीत कापून ऊद्यानाचा शुभारंभ केला.
त्यानंतर उद्यानाच्या दर्शनी भागात ऊभारलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. उद्यानातील ओपन जिम साहित्याचे देखील विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या की, याठिकाणी बसवण्यात आलेले देशातील थोर स्त्रियांचे विविध पुतळे अत्यंत प्रेरणादायक आहेत. पालिकेने महिलांसाठी विविध उपक्रम राबविले असून यापुढे महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल देखील बनविण्यात यावे. या उद्यानात महिलांसोबत बारा वर्षातील मुले देखील येऊ शकतील. त्यामुळे महिलांना मनमुराद असा आनंद लुटता येईल, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले की, या ठिकाणी येऊन नैसर्गिक वातावरणामुळे पर्यटन स्थळात आल्यासारखे वाटते. महिला ज्यावेळेस आपल्या सुख दुःखात उद्यानात येतील तेव्हा नक्कीच आनंद घेऊ शकतील. मन दुखी असताना जरी येथे आल्या तरी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या या महिलांच्या पुतळ्यांमुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
शिक्षण सभापती नंदा जाधव, महिला बालकल्याण सभापती भावना गुरव , माजी उपनगराध्यक्ष भारती राजपूत, सोनिया राजपूत, मनीषा वळवी ,ज्योती पाटील, आशा बालानी, जागृती सोनार, हर्षा बाफना ,शकुंतला माळी, सुरेखा मराठे सारिका पाटील यांच्यासह बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील महिला उपस्थित होत्या