14 महिन्यांनी झाला गुन्हा दाखल; ‘जय भीम’ चित्रपटाप्रमाणे ‘चिन्या’ हत्या प्रकरणात काय आहे साम्य ?

जळगाव – न्यायालयीन कोठडीतील आरोपी चिन्या जगताप याला पोलिसांनी बेदम निर्दय मारहाण करून हत्या घडविल्याचा सनसनाटी आरोप जगताप याच्या पत्नीने करून वर्ष लोटले. त्यावर सातत्याने न्यायालयीन लढाई या महिलेने चालवली असून अखेर तब्बल 14 महिने उलटल्यावर याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

     सध्या गाजत असलेल्या ‘जय भीम’ चित्रपटात दाखवलेल्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाशी साम्य दर्शवणारे हे प्रकरण म्हटले जाते. याबाबत  नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, याप्रकरणात नशिराबाद पोलीस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  अधिक तपास केला असता चौकशीमध्ये दोषी आढळल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
 मयत चिन्या जगताप याची पत्नी मीना जगताप यांनी लेखी तक्रारीत आरोप केला आहे की,  तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील , दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच ११ सप्टेंबर २०२० रोजी  त्याचा मृत्यू झाला. त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हा नोंदवावा म्हणून वारंवार निवेदन दिले. मात्र या संशयास्पद मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होत नव्हता. त्यानंतर मीना जगताप यांनी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयााात धाव घेतली. उच्च न्यायालयात याचिका ( क्रमांक – १७०६ / २०२० ) दाखल केली. या याचिकेची गंभीर दखल आता उच्च न्यायालयाने घेतली आहे. मयत जगतापच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात आणि व्हिसेरा अहवालात नमूद असल्याचे व तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. चिन्याला कशी मारहाण झाली याची माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिल्याचे समजते. या आधीही न्यायालयीन चौकशीदरम्यान काही कारागृह बंदी यांनी या ५ आरोपींच्या विरोधात जबाब नोंदविल्याचे म्हटले जाते.
थोडक्यात घटनाक्रम असा
मीना जगताप यांनी कथन केलेला घटनाक्रम असा की, एका गुन्ह्यात पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यावर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. म्हणून ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात त्या पतीला भेटायला गेल्या. पण तेथील  शिपाई महिलेने ‘तुम्हाला भेटायचे असेल तर कोर्टाची ऑर्डर आणा’ असे सांगून भेट नाकारली. त्यानंतर मिनाबाई घरी निघून आल्या. थोड्याचवेळात घराजवळील रहिवासी व्यक्तीने चिन्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मिनाबाई ह्या लगेचच जिल्हा कारागृहात तातडीने गेल्या. तेव्हाही महिला कर्मचाऱ्यांनी भेट नाकारून मिना यांना हाकलून लावले. नंतर दोन पोलीस अधिकारी तेथे आले व त्यांनी मिनाबाई यांना, चिन्याची तब्बेत गंभीर असून तुम्ही गोदावरी हॉस्पिटलला जा, असे सांगितले. त्यामुळे मिनाबाई गोदावरी फोंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गेल्या. तिथे स्ट्रेचरवर चिन्या जगतापचा मृतदेह त्यांना दिसला. मिना जगताप यांचे म्हणणे आहे की, त्यांचे डोळे उघडे होते. कपडे चिखलाचे भरलेले व फाटलेले होते. पूर्ण शरीर ओले आणि पाठीवर मारहाणीचे वळ होते. डाव्या डोळ्याच्या खाली मार लागलेला व हात मनगटापासून फ्रॅक्चर झाल्याचे दिसत होते. उजवा कान व त्या मागील भाग लाल-काळा झालेला होता. पतीच्या अंगावर निर्दय मारहाणीच्या खुणा होत्या, असेही मिनाबाई जगताप यांनी म्हटले आहे. तथापि अशी मारहाण पोलीस कोठडीत झालेली नाही व जगताप यांचा मृत्यू कोठडीत झालेल्या नाही, असा दावा संबंधित पोलीस करीत आहेत. तरीही पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला इतकी जीवघेणी मारहाण केली कोणी? हा प्रश्न इतके महिने अनुत्तरित राहिला. हे या प्रकरणाची विशेष आहे. आता या प्रकरणाचा खरोखर संपूर्ण उलगडा होईल का ? याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!