नंदुरबार – भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे संविधान जनजागृती यात्रा समवेत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची दि.23 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत भीम आर्मीचे नंदुरबार जिल्हा प्रमुख संजय रगडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
संजय रगडे यांनी सांगितले की, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन होताच त्यांचे आदिवासी संस्कृती प्रमाणे स्वागत करण्यात येणार आहे. ते सुरत येथून सकाळी निघणार असून दुपारी 12.30 वाजेपर्यंत नंदुरबारात आगमन होईल. यानंतर दुपारी दीड वाजेनंतर नंदुरबार शहरातील गणपती हॉटेल धुळे चौफुलीपासून कार व मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे अंधारे चौक, आमदार कार्यालय, नगरपालिका, नेहरू चौक मार्गे पोलीस कवायत मैदानावर येवून रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान सभा घेण्यात येणार आहे. तसेच सभेनंतर भीम आर्मीच्या पाठशाळेला भेट देवून युवकांशी संवाद साधणार आहेत. तसेच भीम आर्मी जिल्हा संपर्क कार्यालयाचा शुभारंभ चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यानंतर सायंकाळी तालुक्यातील पातोंडा येथील संघटनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते भैय्या पिंपळे यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या आईशी संवाद साधणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांशी बैठक घेवून मार्गदर्शन करणार आहेत.