31 डिसेंबर तथा नववर्षारंभानिमित्त चालणारे गैरप्रकार रोखा; हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

नंदुरबार – 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांवर तसेच फटाके फोडण्यावर प्रतिबंध घालावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी निवेदन स्वीकारून समितीचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रसंगी समितीचे सतीश बागुल, आकाश गावित, जय पंडित ,राहुल मराठे, गौरव धामणे, राजु चौधरी उपस्थित होते.
समितीने निवेदनात म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हे यांची विटंबना रोखणे, फटाक्यांद्वारे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली 20 वर्षे जनजागृती करत आहे, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना साहाय्यही करत आहे. तरी गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमीक्रॉन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’ मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता 25 ते 31 डिसेंबरपर्यंत नवर्षानिमित्त सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी. या गैरप्रकारांच्या माध्यमातून कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होते तसेच त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासनावर येतो. त्याचबरोबर असल्या गैर प्रकारांमुळे देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी या सर्व सूत्रांचा गांभीर्याने विचार करून सामाजिक आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!