31 डिसेंबर साजरा करतांना याचाही विचार व्हावा..

वाचकांचे पत्र..
31 डिसेंबर साजरा करतांना याचाही विचार व्हावा..
मा. संपादक
कृपया प्रसिद्धीसाठी
सध्या सगळीकडे 31 डिसेंबरचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे.त्याची जय्यत तयारी  चालू असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. 1 जानेवारी म्हणजे आपले नवीन वर्ष, असा समाजामध्ये अपसमज सहजगत्या रुजल्याचे दिसून येते. खरेतर 31 डिसेंबर हा पाश्चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे. इंग्रजी कालगणनेनुसार येणारी वर्षाची अखेर आणि इंग्रजी कालगणनेनुसार येणारी नव्या वर्षाची सुरुवात असते. इंग्रजी वर्ष ख्रिस्ती समाज मनवतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यातील प्रेम भाव समजू शकतो. परंतु ते करता करता आपण आपली मुळ हिंदू काल गणना विसरून बसलो त्याचे काय ?
 31 डिसेंबर साजरा करता करता आपले नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते, याचाच विसर पाडला गेलाय. आपण पाश्चात्त्य संस्कृतीच्या इतके अधीन झालोआहे की, आपल्या सर्व धर्माचरणाच्या कृती आपण सहजपणे दृष्टीआड करतो. एक दिवस मजा केल्याने असा बरं काय फरक पडतो ? हा प्रश्न काही जण करतात. पण बांधवांनो, एक दिवसाचे का होईना आपले हे वैचारिक धर्मांतरणच  नव्हे का?
   काही जण म्हणतात हिंदूंचे आणि इतर धर्मीयांचे रक्त सारखेच असते ना? तर त्यांचे सण साजरे करायला काय हरकत आहे. त्यांनी हे समजून घ्यायला हवे की, प्रत्येकाचा धर्म हा वेगवेगळा असतो. जो आपल्या धर्मशास्त्रानुसार अनुसरण करतो त्याला तसे परिणाम मिळतात. त्याच्यात एक सकारात्मकता येते. पण हिंदू त्याचे महत्त्व जाणून न घेता हिंदूंचे सण सोडून इतर धर्मीयांचे सण साजरे करतात. ३१ डिसेंबरच्या रात्री पार्ट्या करून स्वतःचे अधःपतन करून घेत आहेत. इंग्रजी वर्षारंभ मध्यरात्री मद्य पिऊन मनवतात. हिंदु नववर्षारंभ सूर्योदयाला शुध्दस्नान करून, गुढी ऊभारून साजरा करतो. हा फरक आहे. गुढीपाडवा म्हणजे विजयाचा दिवस आहे. या दिवशी वनवास पूर्ण करून श्रीराम अयोध्येत परत आले, त्याचा आनंद उत्सव म्हणून विजयाची गुढी उभारली होती. तेव्हा या दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. या दिवशी, वर्षभरात काय करणार आहोत याचा संकल्प करतात. तेथून नवीन वर्षाची सुरुवात होते.
        आणखी महत्त्वाचे असे की, गुढीपाडव्याच्या दिवशी इतर धर्मीयातील किती जण गुढी उभारण्याचे चित्र प्रसारित करून शुभेच्छा देतात ? हे 31डिसेंबर मनवणारे लक्षात घेत नाही. ते जर त्यांच्या शास्त्राविषयी कट्टर असतात तर आपण का राहू नये? धर्मो रक्षति रक्षितः हे वाक्य लक्षात ठेवून हिंदूंनी सणांचे महत्त्व जाणून घेऊन त्यानुसार कृती केल्यास आपल्यालाच लाभ होणार आहे. म्हणून आपण नवे वर्ष 1 जानेवारीला नव्हे तर गुढीपाडव्याला साजरे करण्याचा संकल्प करावा असे वाटते.
–  कु. सानिका जोशी, नंदुरबार

2 thoughts on “31 डिसेंबर साजरा करतांना याचाही विचार व्हावा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!