नंदुरबार – वीजखांबावरील दुरुस्तीसाठी चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे या शेतकऱ्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. शोकसंतप्त ग्रामस्थांनी यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला. तथापि वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत या घटनेला जबाबदार धरून दोन वीज कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. तसेच मयत शेतकऱ्याच्या भावाला नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे.
हा सर्व दुर्दैवी घटनाक्रम नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावात घडला. याप्रकरणी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे ( वय 32 ) हा ट्रांसफार्मर बसवण्याच्या ठिकाणी हजर होता. त्याप्रसंगी जाधव नामक वायरमनने खांबावर चढण्यास विनंती केली. वीज चालू असल्याने चढणार नाही, असे तो म्हणाला. तथापि सबस्टेशनवरून वीज खंडित करण्यास सांगितले असल्याने तू बिनधास्त चढ असे सांगत वीज कर्मचाऱ्यांनी गिरासे यांना खांबावरती चढण्यास भाग पाडले. पंकज खांबावर चढला आणि विद्युत वाहक तारांना त्याचा स्पर्श होताच तो तारांना चिकटला. त्याचे पूर्ण शरीर काळपट पडून जागीच या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटना घडताच गावात खळबळ उडाली. संतप्त जमाव थेट नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आणि वीज वितरण कार्यालयावर धडकला. यादरम्यान सुमारे चार तास मृतदेह खांबावरच अडकलेला राहिला. या घटनेची दखल घेऊन पोलीस अधिकारी ताफ्यासह गावात हजर झाले. त्यांनी जमावाला नियंत्रित केले. वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील,  खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी देखील धाव घेऊन मयत शेतकऱ्याच्या परिवारांचे सांत्वन करीत जमावाची समजूत काढली.
     याप्रसंगी कार्यकारी अभियंता संजय पाटील,  खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी मयताच्या परिवारास रोख 20 हजार रुपयांची मदत दिली. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून चार लाख रुपयांची मदत मिळवून दिली जाईल असे सांगितले. दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात वरिष्ठ तंत्रज्ञ शरद आर जाधव आणि वरिष्ठ ऑपरेटर ललित चांदणे या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यावर जमाव आग्रही राहिला. म्हणून या दुर्घटनेला जबाबदार धरून या दोन्ही कर्मचाऱ्यांना लगेचच निलंबित करण्यात आले. तसेच पंकजच्या लहान भावास वीज वितरणच्या नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले.
मयत पंकज गिरासे हे इतर शेतकऱ्यांची शेती भाडेपट्ट्याने करीत असत. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झालेला. त्यामुळे त्यांच्या आई प्रमिलाबाई यांनी मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून त्यांचे संगोपन केले. घरातील कर्ता व मोठा म्हणून पंकज होता. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!