नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागातील बालमृत्युच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कृती आराखडा तयार करून नियोजन करावे. तसेच बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराची प्रत्येक टप्प्यात चाचपणी करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, आदिवासी आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा) आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, गरोदर मातांच्या अनुदानासाठी त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक रेशनकार्ड आदी कामे वेळेवर पूर्ण करुन त्यांना अनुदान वेळेत मिळेल यांची दक्षता घ्यावी. हे कामकाज सर्व यंत्रणांचे जलद व पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करावे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लगेच लाभार्थ्यांना त्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यावर अनुदान वितरणाची व्यवस्था करावी.
कुपोषण मुक्तीसाठी यंत्रणांनी महिन्यातून एकदा बैठका घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात योग्य समन्वयातून 50 टक्के काम कमी होणार आहे. अधिकाऱ्यांना काम करतांना ज्या त्रुटी,अडचणी येतात त्या तत्काळ शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यावर उपाययोजना करता येतील. बालकांच्या पॅकेज फुडमधील आहार रोज एकसारखा न देता आलटून पालटून वेगवेगळा द्यावा, त्यातून बालकांना पोषण आहाराची गोडी लागेल, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले.
पहाडी व दुर्गम भागातील प्रत्येक इमारत बांधकामात विद्युतीकरणासोबतच सोलर सिस्टीम अनिवार्यपणे बसवावी. वाड्यापाड्यातील सर्व लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ऑनलाईन लिंक करावेत. ज्तसेच या गांवांशी धान्य वितरणासाठी संपर्क होवू शकत नाही त्या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यांची कामे करुन ती गांवे रस्तांच्या माध्यमातून संपर्कात आणावित. आरोग्य विभागाच्या सर्व वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसविण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. गावीत यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
पोषणयुक्त आहार बनविण्याचे प्रशिक्षण देणार* :डॉ. प्रदीप व्यास
बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी महिला व बाल कल्याण व आरोग्य विभागाने नियमित एकत्र आढावा घ्यावा. धडगांव व अक्कलकुवा भागातील आदिवासी माता व बालकांना पोषणयुक्त मिळाला पाहिजे व तो बनविण्यासाठी त्या महिलांना स्थानिकस्तरावर प्रशिक्षण देणार असून पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी 100 टक्के पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना यावेळी अप्पर मुख्य सचिव श्री. व्यास यांनी दिल्या आहेत.
बैठकीत नवसंजीवनीसह इतर योजनांचा आढावा घेवून त्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेत विविध विभागाचे अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.