नंदुरबार – महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना दुर्गम भागात प्रशासकीय संनियंत्रण ठेवणेसाठी करावे लागणाऱ्या शासकीय दौऱ्यांची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रक्कम रु.२० लक्ष करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. विशेष म्हणजे तात्काळ दखल घेऊन अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रु.१२.०० लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याचे आश्वासन दिले.
याविषयीचे अधिक वृत्त असे की, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन खरेदीची मर्यादा रु.२० लक्ष करण्याची मागणी केली होती. याआधी वाहन खरेदीची मर्यादा रु.१२ लक्ष इतकी होती. परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद अध्यक्षांना जिल्ह्यातील दुर्गम भागातील दौरे तसेच प्रशासकीय यंत्रणावरील संनियंत्रण ठेवणेसाठी आवश्यक शासकीय दौऱ्यांची व्याप्ती लक्षात घेता तसेच सर्व जिल्ह्यांची विकास कामे व जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागत असतो. या सर्व बाबी लक्षात घेता डॉ. सुप्रिया गावित यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत आज दिनांक- २३.०८.२०२३ रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रक्कम रु.२० करण्या बाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना दिले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रु.१२ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याचे आश्वासन दिले. डॉक्टर सुप्रिया गावित यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सदर मागणी तातडीने पुर्ण करण्या बाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलेले आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांनी डॉ. सुप्रिया गावित यांचे आभार मानले.