जळगाव – रुग्ण सेवा देणाऱ्या अँब्युलन्स मालकाकडून मलिदा उपटू पाहणाऱ्या एका डॉक्टरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून धडा शिकवला. भाडे तत्वावर लावण्यात आलेल्या रुग्ण वाहीकांच्या बिलांची पडताळणी करुन देण्याच्या मोबदल्यात 60 हजार रुपयांची लाच घेताना 108 रूग्णवाहीका वरील हा कंत्राटी डॉक्टर रंगेहात पकडला गेला असून यामुळे येथील आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
काल दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) असून त्या कोरोना काळात क़ोरोनारुग्णांची चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड़यांतून तसेच चाळीसगाव येथून जळगाव येथे ने-आण करण्यासाठी चाळीसगावच्या ग्रामीण रुग्णालयात व ट्रामा सेंटर येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. सदर रुग्ण वाहिकांच्या मिळणाऱ्या बिलांची पडताळणी करुन त्याबाबत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे पत्र सही शिक्यानिशी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव यांचे कडून पडताळणी करणे आवश्यक होते.
ती पडताळणी करून आणून देण्याच्या मोबदल्यात 108 रूग्णवाहीका वरील कंत्राटी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद वय-३८, (B.A.M.S.), रा.घाट रोड,चौधरी वाडा,चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव याने ॲम्बुलन्स मालकाकडे चक्क 60 हजार रुपयांची मागणी केली. म्हणून ऍम्ब्यूलन्स मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी सापळा रचला. या डॉक्टरने अंबुलन्स मालकाला त्याच्या घाटरोड, चाळीसगाव येथील खाजगी सैय्यद क्लीनिकमधे बोलावले होते. या ठिकाणी त्यावेळी अंबुलन्स मालकाकडून पंचासमक्ष या डॉक्टरने ६०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली. त्या प्रसंगाचे छायाचित्रण करीत लगेच पथकाने झडप घालून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने(नाशिक परिक्षेत्र, नाशिक), अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे (ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी ही कारवाई केली. सापळा व मदत पथकात या विभागाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, नायक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांचा समावेश आहे.