नंदुरबार – कार्यकर्त्यांनी विरोधकांची चिंता करू नये. गेल्या ४० वर्षापासून विकास कामांच्या माध्यमातून जनतेची प्रामाणिक सेवा करीत आहोत. ज्येष्ठांच्या आशीर्वाद व युवकांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या झेंडा फडकवा असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थगित पोटनिवडणुकीच्या पुन्हा बिगुल वाजला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचे वातावरण पुन्हा एकदा राजकारणाने तापायला सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी शिवसेनेचे नेते, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या प्रसंगी रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजीराव मोरे, मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांच्यासह शिवसेनेचे गट व गणातील उमेदवार उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांनी भाषणे घोषणाबाजी न करता प्रत्येक घरातील मतदारांपर्यंत पोचवा. विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे असते. सत्तेशिवाय कुठलीच कामे होत नसतात. त्यामुळे जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या झेंडा फडकवा असे आवाहन रघुवंशी यांनी केले.