नंदुरबार -आज झालेले मतदान भाजपाला जागा वाढवून देणार का? की, काँग्रेस- शिवसेनेचे बळ वाढवणार ? हे आजच्या मतदानातून सिद्ध होणार असल्यामुळे गावागावात चुरस आणि उत्सुकता पाहायला मिळाली. त्याचबरोबर आजच्या मतदानातून युवा नेत्यांचे भविष्य देखील मतपेटीत बंद झाले आहे.
ओबीसी आरक्षण हटवल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेतील 11 गटांच्या जागा तसेच पंचायत समितीच्या 14 जागा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी ही पोटनिवडणूक पार पडली. येथील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आज एकूण 2 लाख 82 हजार 387 मतदारांपैकी 1 लाख 86 हजार 322 हून अधिक मतदारांनी म्हणजे जवळपास 66 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. साडेपाच वाजेपर्यंतची ही अंदाजित आकडेवारी असल्याचे शासकीय माहितीत म्हटले आहे.
तथापि मतदारांचा उत्साह लक्षात घेता काही अंशी या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असून 68 ते 70 टक्के मतदान झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता सदस्य कमी-जास्त होण्याने सत्तेची गणितं बदलू शकतात; असे काही कार्यकर्त्यांना वाटते. काँग्रेस 23, भाजपा 23, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3 असे एकूण पक्षीय बलाबल होते. परंतु ओबीसी आरक्षण हटविण्याचा फटका बसून भाजपाच्या 7 जागा कमी झाल्या आहेत. आज झालेले मतदान भाजपाला जागा वाढवून देणार का? की, काँग्रेस- शिवसेनेचे बळ वाढवणार ? हे मतमोजणी अंती कळेल. याच बरोबर राजकारणात प्रथमच प्रवेश करणाऱ्या व नवीन असलेल्या युवा नेत्यांचे राजकीय भविष्य देखील मतमोजणीअंती कळणार आहे. यात माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपाच्या खासदार डॉ.हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव तथा ओबीसी आरक्षणामुळे ज्यांना जिल्हापरिषदेचे उपाध्यक्षपद सोडावे लागले ते ऍड.राम रघुवंशी, डॉ.विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित. त्याच बरोबर पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या पत्नी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजीराव मोरे यांच्या स्नुषा अशा नव्या उमेदवरांच्या लक्षवेधी लढतींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
स.७.३० ते ११.३० पर्यंत झालेले मतदान : –
स्त्री मतदान – ३५१०८
पुरुष मतदान -३७१५२
एकूण मतदान -७२२६०
*टक्केवारी* – २५.५९%*
दुपारी १.३० पर्यंत झालेले मतदान: –
स्त्री मतदान – ६०१५८
पुरुष मतदान -५९६२८
एकूण मतदान -१२०१४६
*टक्केवारी* – ४२.५५%
स.7.30 ते दु. 3.30 पर्यंत झालेले मतदान:-
स्त्री मतदान – 76378
पुरुष मतदान -76971
एकूण मतदान -153349
*टक्केवारी* – *54.30%*
संध्या. 5.30 पर्यंत झालेले एकूण (अंदाजित) मतदान-
स्त्री मतदान – 90711
पुरुष मतदान – 95611
एकूण मतदान – 186322
*टक्केवारी* – 65.98%