67 ‘मिसिंग’ महिला, पुरुष शोधले; जिल्हा पोलिसांची ‘मिसिंग डेस्क’ माध्यमातून विशेष मोहिम

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या विशेष मोहिमेला ६७ बेपत्ता महिला व पुरुष शोधण्यात यश मिळाले आहे. पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून या कामाला वेग देण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक १५ जानेवारी २०२२ ते दिनांक १५ फेब्रूवारी २०२२ पावेतो पोलीस स्टेशन स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचा शोध घेण्याची विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलीस स्टेशन स्तरावर एक अधिकारी व दोन अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन मोहिम राबवायच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील १२ अधिकारी व २४ अंमलदार यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आणि बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांच्यापैकी १५ पुरुष व ५२ महिला शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले. नंदुरबार शहरातील ९, नंदुरबार तालुक्यातील ६, उपनगर ५, विसरवाडी ६ नवापुर ८, शहादा ९, सारंगखेडा ६, धडगाव १, अक्कलकुवा ६, तळोदा ६ व मोलगी ५ अशा बेपत्ता इसमांचा शोध घेण्यात विशेष पथकाला यश आले.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेशान्वये दिनांक १ जुन २०२१ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील मिसिंग डेस्कचे अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक भगवान धात्रक हे काम पहात आहेत. सदर कक्षाकडून बेपत्ता इसमांच्या नातेवाईकांना गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या संपर्कात राहून बेपत्ता बालक, महिला व पुरुष यांच्या मित्रांचा व इतर नातेवाईक यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण करुन बेपत्ता इसमांचा शोध घेतला जातो. सदर कक्षाच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये ६६ महिला व बालके मिळून आले आहेत.
     जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, बेपत्ता इसम हे जास्ती जास्त गरीब घरातील असल्याने ते कामाच्या शोधात कौटुंबिक वादामुळे गुजरात राज्य किंवा इतर ठिकाणी निघून जात असतात. अशा बेपत्ता इसमांचा शोध घेणेसाठी संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदारांना त्याठिकाणी पाठवून त्यांना तेथुन आणले जाते. कामानिमित्त घर सोडून गेलेल्या बालकांना पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शिक्षणासाठी पोलीस दलातर्फे मदत केली जाते. गुन्हे तपासा बरोबरच बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्य मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा.पो उप निरीक्षक भगवान धात्रक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों सजन वाघ शोधकार्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!