अजब तंत्र.. 28 शाळा-कार्यालयात केल्या घरफोड्या; अखेर टोळीला ठोकल्या बेड्या

नंदुरबार  – जिल्हाभरात एक दोन नव्हे तर तब्बल २८ शाळा, कार्यालयांमधे घरफोडीचे सत्र घडल्यानंतर संगणक व तत्सम महत्वाचे साहित्य चोरण्यासाठी थेट जिल्हा परिषद शाळांना लक्ष बनवून घरफोडी करणारी टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. मग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासामुळे १८ गुन्ह्यांमधील टोळीचा सहभाग उघड झाला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ना उघड मालमत्तेच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. मागील काही महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून इनव्हर्टर, बॅटरी व एलईडी टीव्ही चोरी करण्याचे अनेक प्रकार घडले. त्या विषयी गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत, असे या आढावाप्रसंगी अधीक्षक पी.आर.पाटील यांना आढळून आले. तसेच चारी झालेल्या जिल्हा परिषद शाळेमधील चोरीची पध्दत ही एकच असून चोरी करणारी टोळी देखील एकच असल्याचे त्यांना निदर्शनास आले. यावर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषद शाळेतील घरफोडीच्या गुन्ह्यांमधील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासचक्र फिरवले. तेव्हा दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चिरडे ता. शहादा गावात एक इसम कमी किमतीत व विना बिल पावती इनव्हर्टर व बॅटरी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून चिरडे येथे कारवाईसाठी पाठविले. पथकाने चिरडे ता. शहादा येथे वेशांतर करून सापळा रचून संशयीत इसमास इनव्हर्टर व बॅटरीसह ताब्यात घेतले. सदर इसमाने त्याचे नाव सोमनाथ ऊर्फ सोमा काशिनाथ दशरथ वय २१ रा. सुलवाडे ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने अजय आंबालाल मोरे वय २१ रा. सुलवाडे ता. शहादा व अजय ऊर्फ टाईगर राजू पावरा वय-२२ रा. ब्राम्हणपुरी ता. शहादा यांची माहिती दिली. यांच्यासह सुलवाडे व ब्राम्हणपुरी गावातील इतर साथीदारांच्या मदतीने जिल्हापरिषद शाळा फोडण्याचा क्रम त्यांनी चालवला होता. तशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिली.
आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल २८ शाळा आणि अन्य कार्यालयांमधे त्यांनी अशी घरफोडी केली असून यातील १८ चोर्‍या उघडकीस आल्या आहेत व ८ चोर्‍यांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले, असेही ते म्हणाले. चोरी तथा घरफोडी झालेल्या शाळांची यादी याप्रमाणे- जिल्हा परिषद शाळा, जवखेडा ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, पिप्री ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, गोगापुर ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, पाडळदा ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, होळ मोहिदा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा तिखोरा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, परिवर्धा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, सावखेडा ता शहादा, जिल्हा परिषद शाळा, गोदीपुर ता, शहादा, जिल्हा परिषद शाळा, भादे ता. शहादा, जिल्हा परिषद शाळा, डामरखेडा ता. शहादा, ग्राम पंचायत कार्यालय, सावखेडा ता. शहादा, तिखोरा येथील मंदीर चोरी ता. शहादा, ब्राम्हणपुरी येथील तेलाच्या टाक्या चोरी ता. शहादा, शेतकी विद्यालय, कळंब ता शहादा, टवळाई ता. शहादा येथील ऍल्युमिनीयम तार चोरी,रायखेड ता. शहादा येथील टायर चोरी याचा समावेश आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक रविंद्र कळमकर, पोलिस नाईक गोपाल चौधरी, जितेंद्र अहिरराव, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले यांनी ही तपास कामगिरी पार पाडली. याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!