नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांची आणि पंचायत समितीच्या १४ गणांमधील ओबीसी सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार धुरळा आज रविवार दि.३ ऑक्टोबर २०२१ रोजी थंडावणार असून मंगळवार दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान पार पडणार आहे. एरवी पोटनिवडणूका फार प्रतिष्ठा आणि पैसा पणाला लावून लढल्या जात नाहीत; हे बहुतांशवेळा सर्वांना पहायला मिळाले आहे. परंतु या निवडणुकीत त्या उलट स्थिती बनलेली दिसली. प्रमुख नेत्यांच्या घरातील सदस्यच अनेक जागी उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यामुळे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आतील राजकारणामुळे ही पोटनिवडणूक बघता बघता बरीच रंगतदार बनली. हे राजकीय नवतरुण निवडून आल्यास काय काय विकास कामे करणार; याविषयी मतदारांना विश्वास देतांना प्रमुख नेत्यांनी मुलांची व पारिवारिक सदस्यांची उमेदवारी अशी काही प्रतिष्ठेची बनवली की, मतदारांना ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा’; या गाण्याच्या ओळी आपसूक आठवल्या. प्रत्येक गोष्टीत पप्पा, मम्मीला विचारून पाऊल टाकणार्या या उमेदवारांपैकी कोणाकोणाला मतदार स्विकारतात? हे मंगळवार रोजी होणाऱ्या मतदानाअंती कळणार आहे.
तथापि जो काही निकाल लागेल त्यातून जिल्हापरिषद व पंचायत समितीत कोणाचे पक्षीय बलाबल वाढते, याकडे ग्रामीण मतदारांचे अधिक लक्ष लागले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेत ओबीसी राखीव जागा रिक्त होण्याआधीच्या संख्याबळानुसार कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. दीड वर्षांपूवी निवडणूक होऊन सत्ता स्थापन झाली तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य या सत्तेत सहभागी न होता भाजपासोबत बसले होते. महाविकास आघाडीच्या सूत्राला बांधिल रहात आघाडीचे तीनही घटकपक्ष खरोखरचे एकत्रित आले नाही. त्या परिणामी तेव्हा एक सभापतीपद भाजपाला मिळाले होते. आता ११ जागांवर पोटनिवडणूक होत असून सत्तेचे गणित बदलेल की तसेच राहिल? यावर तर्क लावले जात आहेत. ऍड.राम रघुवंशी यांना जिल्हापरिषद सदस्यत्वासह उपाध्यक्षपद ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने गमवावे लागले आणि सत्तेचा वाटाही गमवावा लागला. शिवसेनेला सत्तेचा तो वाटा पुन्हा हवा आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना तेवढ्यासाठीच कोपर्ली गटातील निवडणूक प्रतिष्ठेची वाटत आहे. पंचायतसमिती गणात शिवसेनेचे संख्याबळ थोड्यानेही वाढले तर नंदुरबार पंचायत समितीत सत्ताबदल घडण्याची अपेक्षा रघुवंशी बाळगून आहेत.
दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा खेळ झाला तेव्हा थोड्याशा तडजोडीने जिल्हापरिषद सत्ता मिळवणे भाजपाचे नेते डॉ.विजयकुमार गावित यांना शक्य होते. तथापि काही कारणाने ती संधी यांच्या हातातून गेली होती. डॉ.गावित यांना त्या अर्थाने परिवर्तन घडणे आता अपेक्षीत आहे. या सत्तेची सूत्र हाती राखण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना मुलगी डॉ.सुप्रिया गावित आणि पुतण्या पंकज गावित यांची उमेदवारी अधिक महत्वाची वाटते ती यामुळेच.
जिल्हा परिषदेत पुरेशा संख्याबळामुळे अध्यक्षपद कॉंग्रेस पक्षाकडे असून विद्यमान स्थितीत माजी मंत्री ऍड.पदमाकर वळवी यांच्या कन्या ऍड.सीमा वळवी जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. ते केवळ सध्या कॉंग्रेसच्या जिल्हानेतेपदावर बसलेले आदिवासी विकास तथा जिल्हा पालक मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या सहकार्यामुळे. पण मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी यांचा या पोटनिवडणुकीनंतर जिल्हापरिषदेत प्रवेश झाल्यास पोटनिवडणुकीनंतर याविषयीचे सूत्र बदलतील का? हाही प्रश्न आतापासून चर्चेत आला आहे. मंगळवार रोजी होणारे मतदान यापैकी काय काय घडवेल? याची उत्सूकता कार्यकर्त्यांमधे वाढली आहे.
ईतक्या अनेक संदर्भाने ही पोटनिवडणूक राजकीय कार्यकर्त्यांना मजेदार आणि रंगतदार वाटत आहे. मात्र सामान्य मतदार दुरुनच त्या शाब्दिक खेळाचा आनंद घेत आहे. जनतेचा विकास, गावाचा विकास या शब्दांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. पारावरच्या गप्पांमध्ये उघडपणे त्यावर बोलतात. ठेकेदारीची दुकानदारी अभिप्रेत असलेल्या अर्थानेच विकास शब्द वापरला जातो व मतभेद विसरुन एकत्र येण्याची त्यासाठीच हाक दिली जाते; असे ग्रामीण नवतरुणांचे मत आहे. असा दृष्टिकोन बनलेला हा नवमतदार मतपेटीतून काय घडवतो, हे पुढे पहायला मिळेल. तथापि उल्लेखनीय असे की, मतभेद विसरुन एकत्र या; हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आवाहन तालुक्यात परिणाम घडवू लागलेले दिसत आहे. रघुवंशी यांच्या विरोधात अनेक वर्ष चाललेले वकीलआबा पाटील, दीपक गवते, सोमूभैय्या यांच्यापासून तर डॉ.सुप्रिया गावित यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर लावणारे व गावित गटाचे खास मानले जाणारे मुन्ना पाटील यांच्यापर्यंत बरेचजण आता आपल्या सोबतीला कसे आले आहेत; हे प्रचारसभांमधून चंद्रकांत रघुवंशी जाहीरपणे मांडतांना दिसतात ते यामुळेच.
तथापि राज्य सरकारमधे एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष येथे पोटनिवडणुकीत आपापल्या बळावर लढत आहेत. पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी हे कॉंग्रेसचे नेते असूनही त्यांनी आघाडीचा समन्वय राखायला मदत केली नाही; अशा अर्थाचे आरोप शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रचार सभांमधून केले. त्या उलट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माघारी घेत शिवसेनेला प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा धर्म निभवायला तयार आहे परंतु कॉंग्रेसचा प्रतिसाद नाही; असे चित्र यामुळे बनले आहे. आजची पोटनिवडणूक याच्या अनुषंगाने पुढे काही घडवणार आहे का? आघाडी धर्माचा प्रश्न पुन्हा तापणार काय? याचे उत्तर मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे.