बंदोबस्त कडक; मतदान केंद्रांवर अनुचित प्रकारांना थारा नाहीच : जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

नंदुरबार – येथे होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी 1000 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून राज्य राखीव पोलिस कंपनीचे दोन प्लाटून देखील तयारीत ठेवण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावणारे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसदल दक्ष आहेच. तथापि तसले काही घडवू पाहणाऱ्यांची गय करणार नाही, मतदान निर्भय वातावरणात पार पडेल ; असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी व्यक्त केला.

     येथील जिल्हा परिषदेच्या 11 गटांची व  पंचायत समितीच्या 14 गणांची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीचा प्रचार काल रविवार रोजी सायंकाळी संपला असून उद्या मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी मतदान केले जाणार आहे. यानिमित्त लावलेल्या बंदोबस्त विषयी अधिक माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने एकही मतदान केंद्र संवेदनशील घोषित केलेले नाही. तथापि उपद्रव होण्याची शक्यता असलेले 3 मतदान केंद्र परिसर असून त्यासह 35 अन्य ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. विभागीय पोलिसअधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक यांच्यासह 1000 पोलीस अधिकारी कर्मचारी निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाईवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचा भाग म्हणूनच ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शस्त्रसाठा पकडण्या सह आरोपी पकडणे चालू आहे. पेट्रोलिंग आणि बंदोबस्त यासाठी पथक कार्यरत आहे असेही जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!