नंदुरबार : सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरू आहे. तर वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी व उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना व सोबतच विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
उपाय योजनेचा भाग म्हणूनसध्या पर्जन्यमानात घट झाली असून तापमानात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत आहे. ही वाढ आणखी अपेक्षित असल्याने व विजेची वाढती तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषी वाहिन्यांवर प्रतिदिन ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. मागणीनुसार विजेचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कृषी वाहिन्यांवरील वीजपुरवठ्याचा कालावधी पूर्ववत करण्यात येणार आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, देशभरातील कोळसा टंचाईमुळे पॉवर एक्सचेंजमधूनही पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याची सध्या स्थिती आहे. परिणामी इतर राज्यांतील विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेचे सरासरी दर १२ ते १४ रुपये प्रतियुनिटपर्यंत गेले आहेत. विजेच्या कमाल मागणीच्या कालावधीत हे दर प्रतियुनिट २० रुपयांपर्यंत जात आहेत. तरीही महावितरणकडून मागणी व उपलब्धता यात ताळमेळ ठेवण्यासाठी या दराने आवश्यकतेप्रमाणे वीज खरेदी करून विजेचे भारनियमन टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेची उच्चतम मागणी ही सुमारे १७ हजार ५०० ते १८ हजार मेगावॅटदरम्यान आहे. महावितरणने औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत सुमारे २१ हजार मेगावॅट वीजपुरवठ्याचा करार केला आहे. मात्र सद्यस्थितीत या करारातून जवळपास ११ हजार ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अपारंपरिक व इतर ऊर्जा स्रोतांकडून जवळपास ३ हजार मेगावॅट घेण्यात येत आहे. सोबतच कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पामधून १९०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. तर उर्वरित १५०० ते २००० मेगावॅट विजेची तूट ही पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीद्वारे भरून काढण्यात येत आहे, असे महावितरणच्या माहितीत म्हटले आहे.
कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने विजेची मागणी सर्वाधिक असलेल्या सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत नागरिकांनी विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा. विजेचा अनावश्यक वापर टाळावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तफावत कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही. नेहमीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.