नंदुरबार-स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर योग्यवेळी बंद करुन आपल्या घरावर आलेले संकट टाळून नुकसान वाचवण्याचा प्रयत्न अवघ्या पहिलीत शिकणार्या बालिकेने केला. याबद्दल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड.राम रघुवंशी यांनी या बालिकेचे कौतुक केले.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील कोकणी हिल परिसरातील गंगानगर भागात शिक्षक अशोक कागणे व पोलीस कर्मचारी वैशाली कागणे राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सौ.वैशाली कागणे यांनी नेहमीचा स्वयंपाक केला आणि कामावर जाण्याच्या घाईमुळे त्या पटकन निघून गेल्या. जाताना त्यांच्याकडून गॅसचे बटन चालू राहिले. पी.जी.पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत शिकणारी कन्या साईश्वरी ही एकटीच घरी होती. अन्य कोणीही घरी नव्हते. तिला घरात गॅस सुरू असावा, हे घरात पसरलेल्या वासावरून जाणवले. तिला नेमके कोणते बटन कसे बंद करावे याची माहिती नव्हती. मात्र आपण किमान दरवाजे खिडक्या उघडाव्यात, जेणेकरून वास बाहेर जाईल या भावनेने तिने दरवाजा खिडक्या उघडल्या. शेजारीच राहणार्या नितल पाटील यांना आपल्या घरी बोलावून आणले. तेव्हा श्रीमती पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गॅसचे बटन बंद केले आणि सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या.

बालिकेच्या प्रसंगावधानामुळे कागने कुटुंबावर येणारा मोठा भीषण प्रसंग टळला. केवळ त्यांचेच घर नाही तर परिसरालाही त्याचा धोका निर्माण झाला असता.
श्रीमती कागणे ह्या पोलीस कर्मचारी आहेत. आपल्या मुलीच्या या प्रसंगावधानाची माहिती त्यांनी आपल्या सहकार्यांना दिली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी श्रीमती कागणे यांच्याकडून वस्तूस्थिती समजून घेतली व साईश्वरीचा सत्कारही केला. त्याचप्रमाणे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य ऍड.राम रघुवंशी यांनी देखील तिचा सत्कार केला. तिच्या या समयसूचकतेचे परिसरातही कौतुक होत आहे. तिचे प्रशिक्षक रहीम शेख, सर्पमित्र विशाल नागरे यांनी तिचे विशेष कौतुक केले.