धुळे – भांग, गांजा, अफूची जप्तीप्रकरणे काही महिन्यापासून जिल्ह्यात गाजत असतानाच धुळयातील मुंबई आग्रा महामार्गावर एका तरुणाकडुन सुमारे आठ लाख रुपये किमतीची अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याने धुळेकर हादरले आहेत. ही ब्राऊन शुगर ज्याच्याकडे सापडली तो भुसावळ येथील रहिवासी असून धुळ्यात कोणाला देण्यासाठी त्याने हा साठा आणला होता ? हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.
या घटनेची गंभिर दखल धुळयाचे पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी घेतली असून या आरोपीची कसून चौकशी करणे सुरु आहे. मुंबई आग्रा महामार्गावरुन हा साठा नाशिक, पुणे, मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता होती का? हे देखिल पोलिस तपासून पहात आहेत .
प्राप्त माहितीनुसार अंमली पदार्थाची मोठी खेप धुळयात येणार असल्याची माहीती विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर व मोहाडी पोलिसांना मिळाली होती. म्हणून अंमलीपदार्थविरोधी पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक गेल्या दोन दिवसांपासून या तरुणाच्या मागावर होते. अखेर मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेंन्सीच्या बाहेर उभा असून त्याच्याकडे अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहीती येताच शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा अर्धा किलो ब्राऊन शुगरचा साठा आढळून आला. प्राथमिक चौकशीत या तरुणाने स्वतःचे नाव सैयद शेरु सैयद बुडन असल्याचे सांगितले. तो भुसावळ शहरातील मदीना मशीदीजवळीत रहीवासी आहे. धुळयात विक्री करण्यासाठी हा भुसावळ येथून अंमली पदार्थाचा साठा घेऊन आला असल्याची माहीती पोलिसांना दिली आहे.