डॉक्टर नंदकुमार माने मु. पोस्ट तालुका औसा जिल्हा लातूर यांचे ‘किल्लारी भूकंपा वरील साहित्यकृती ,आशय आणि आकलन’ हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. साहित्य हे काळाचे अपत्य असे म्हणतात. त्यामुळेच किल्लारीच्या काळरात्रीचे विदारक वास्तव अनेक साहित्यिकांनी शब्दबद्ध केलेले आहे त्यात ज्येष्ठ लेखक रा रं बोराडे डॉक्टर जे एम वाघमारे डॉक्टर सुरेंद्र पाटील विलास पाटील अतुल देऊळगावकर भालचंद्र देशपांडे फ.मु. शिंदे , डॉक्टर अशोक कुकडे ,ऍड. हाशम पटेल ,विनय अपसिंगकर डॉक्टर मथु सावंत अशा अनेक लेखक विचारवंत प्रतिभावंतांनी हे विदारक वास्तव साहित्यातून मांडले. या सर्वांच्या साहित्यकृतीचा एकत्रित अभ्यास होणं गरजेचं होतं. ते महाकठीण काम ते पुस्तक रूपाने करण्यात आले. त्यामुळेच वाचनीय आणि अभ्यासपूर्ण असं हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवण्यासारखे बनले आहे. भूकंपग्रस्तांवर आणि तिथल्या स्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या त्या पुस्तकांची माहिती, लेखकाच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाची माहिती जाणकारा पर्यंत जाणं आत्यंतिक महत्त्वाचं काम होतं आणि हे काम डॉक्टर नंदकुमार माने यांनी 30 सप्टेंबर 1993 च्या “किल्लारी भूकंपाचा मराठी साहित्य वरील प्रभाव :एक अभ्यास” या शोधप्रबंधच्या माध्यमातून त्यांनी केलं. हे शोधकार्य या पुस्तकाच्या रुपाने जाणकार , रसिक वाचक आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध झालेलं आहे.
या “किल्लारी भूकंपा वरील साहित्यकृती, आशय आणि आकलन” या नावाने प्रकाशित झालेल्या या पुस्तकात राजेंद्र भंडारी लिखित “भय इथले संपत नाही” या पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करीत विशेष दखल डॉक्टर नंदकुमार माने यांनी घेतली आहे. राजेंद्र भंडारी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील लामकानी येथील आहेत. तथापि काही वर्षांपासून उस्मानाबाद येथील मुक्कामी रहिवासी झाले आहेत.
राजेंद्र भंडारी यांच्या पुस्तकाविषयी खूप सविस्तर उल्लेख डॉक्टर माने यांनी केला आहे. त्यावरील प्रकरणात त्यांनी म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील लामकानी या गावचे रहिवासी असलेले राजेंद्र भंडारी नोकरीच्या निमित्ताने उस्मानाबादला येतात आणि भूकंपापासून उस्मानाबादलाच स्थाईक होतात. भूकंपाचा प्रलय, येथील माणसं, त्यांच जगणं, त्यांच दु:ख ते पहातात. याशिवाय त्यात त्यांना उस्मानाबाद येथील जेष्ट पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांचा सहवास लाभतो. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील काळरात्रीची करुण कहाणी अनुभवलेले पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी या मानवी संहाराचे चित्रण लेखांमधूून मांडले होते. या संपूर्ण वृत्तपत्रातील अनेक लेख व फोटोसह भूकंपावर पुस्तक लिहिता येईल; असा विचार राजेंद्र भंडारी यांच्यासमोर व्यक्त करतात. नंतरच्या पिढीला भूकंपाच्या या सर्व नैसर्गिक आपत्ती माहिती व्हावी या हेतूने श्री राजेंद्र भंडारी लगेच यांनी पुस्तक रूपात ते आकाराला आणले.
भय इथले संपत नाही’ ही धरणीकंपातील माणसांच्या वास्तव जगण्याची कथा आहे. ही कथा साकारत असताना त्या सोबत दिलेल्या फोटोंच्यामुळे वास्तवतेला अधिक गडद रंग निर्माण होतो. मानवतेचे उदात्त हात मदतीसाठी कसे धावून आले. याशिवाय या आपत्तीचा फायदा घेवून स्वार्थी, हव्यासी, क्रूर वृत्तींचे कसे दर्शन घडते, हे यथार्थ मांडलेले आहे. भूकंपानंतर पहायला आलेल्या माणसांनी एक एक दगड जरी उचलला असता तरी कितीतरी जीवाचे प्राण वाचले असते. असाही संदर्भ या पुस्तकातून येतो. ‘मृत्यूचे महानाट्य’ या लेखातही निसर्ग कसा अनेकवेळा नवनवीन गोष्टी निर्माण करतो, हे सांगत असतानाच उगम आणि विनाश …..जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरू आहे. असे ही सांगायला ते विसरत नाहीत. ‘वास्तवाच्या पलिकडे…’ हे भूकंपाचे वर्णनही अशाच रितीने रेखाटलेले आहे. माती आणि मृत्यूच्या ऋणानुबंधाचे जिवघेणे दृष्य पाहतांना काळजाचा थरकाप होत होता.. खेड्यातल्या माणसात दूर्दम्य आशावाद दिसतो. ‘अश्रूनी हात टेकले’ ‘स्तब्ध आणि निशब्द… ‘ या प्रकरणात ऊनही कल्पने पलिकडचा विध्वंस’ राजेंद्र भंडारी यांनी मांडला आहे.