अनेक शेतकऱ्यांना दिलासा; सातबाऱ्यावरून ५४ हजार १५० कालबाहय नोंदी हटवल्या

नाशिक : सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्याची नाशिक महसूल विभागात मोहीम राबविण्यात येत आहे. सातबारा उताऱ्यावरील अनावश्यक बोजा, नोंदीमुळे शेतकऱ्यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज घेण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असलेल्या सात-बारा उता-यांवर गेल्या अनेक वर्षांपासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडींग, सावकारी बोजे आणि नजर गहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्या नोंदी आहेत. जमिनीच्या सात-बारा उता-यावरील जुन्या सावकारी कर्जाच्या नोंदीमुळे अनेक जटील प्रश्न निर्माण होत होत्या. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी विक्री करताना आणि संपादीत जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामधून अनेक वाद निर्माण होत होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून अशा प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याची धडक मोहीम घेऊन कालवाहय नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिका-यांना नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते.
या मोहिमेविषयी सविस्तर माहिती देतांना आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सात-बारा उता-यावरील कालबाहय नोंदी कमी झाल्यामुळे महसूली अभिलेख परिपूर्ण व दोषविरहीत होऊन शेतकरी व सामान्य नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. राज्यातील ही एक अभिनव मोहीम असून अभिलेखे दोषविरहीत झाल्याने वाद विवाद कमी होतील.
       नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात सात-बारा उता-यांची एकूण संख्या ४६ लाख ९७ हजार १२२ एवढी असून यापैकी ७५ हजार ९९९ एवढया सात-बारा उता-यांवरील इतर हक्कात कालबाहय नोंदी होत्या. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात १७ हजार ९८८, धुळे जिल्ह्यात ६ हजार ४७८, नंदुरबार जिल्ह्यात ६ हजार ९८६, जळगाव जिल्ह्यात ३२ हजार ०५५ आणि अहमदनगर जिल्हयात १२ हजार ४९२ कालबाहय नोंदी होत्या. ऑगस्ट महिन्यापासून सात-बारा उता-यावरील कालबाहय नोंदी कमी करण्याची धडक मोहीम हाती घेतल्यानंतर मागील दोन महिन्यात एकूण ५४ हजार १५० कालबाहय नोंदी कमी करण्यात आलेल्या आहेत. 
    यामध्ये नाशिक जिल्ह्यात ८ हजार ५५२. धुळे जिल्ह्यात४ हजार ७९८, नंदुरबार जिल्ह्यात ६ हजार ००४, जळगाव जिल्ह्यात २५ हजार ५४९ तर अहमदनगर जिल्हयात ९ हजार २८७ इतक्या कालबाहय नोंदी सात-बारा उता-यावरील इतर हक्कांमधून कमी करण्यात आलेल्या आहेत. अशी माहितीही गमे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
   “माझ्या सातबाऱ्यावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे मला कृषी कर्ज तात्काळ मार्गी लागले.” अशी शब्दात श्रीकृष्ण पांडुरंग धांडे, मौजे फत्तेपूर, ता. जामनेर, जळगाव यांनी या मोहीमेविषयी भावना व्यक्त केली
 “माझ्या रावेर तालुक्यातील खिरोदा गावातील गट नं-94 मधील जमिनीवर असलेला तगाई कर्जाचा अतिशय जूना कालबाह्य बोजा रद्द केल्याबद्दल मी महसूल विभागाचा आभारी आहे.” अशी भावना शेतकरी सतीश चौधरी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!