नंदुरबार – आतंकवादी कधीही भारतात युध्द पुकारू शकतात, हे सद्यस्थितीवरुन दिसत असून त्यामुळे भविष्यात जी स्थिती उदभवेल त्याप्रसंगी किमान आपले स्वत:चे, परिवाराचे, समाजाचे संरक्षण करण्याची सिध्दता करा; असे आवाहन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांनी विजयादशमीनिमित्त दिलेल्या संदेशाद्वारे केले. विजयादशमी निमित्त येथील सिध्दीविनायक गणेश मंदिरात अत्यंत चैतन्यमय वातावरणात व उत्साहात हिंदु जनजागृती समिती आयोजित शस्त्रपुजनाचा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी या संदेशाचे जाहीर वाचन करण्यात आले. देव, देश आणि धर्म रक्षणाच्यादृष्टीने शस्त्रांचे महत्व पुराणकाळापासून सांगितलेले आहे. येणारा आपत्काळ लक्षात घेता घराघरातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्रासह सिध्द रहावे; असेही आवाहन याप्रसंगी प्रमुख वक्ते हिंदु जनजागृती समिती सेवक प्रा.डॉ.सतिष बागूल यांनी केले. नंदुरबार शहरातील उद्योजक हेमंत पाटील व सौ. आशा हेमंत पाटील यांच्या हस्ते शस्त्रपुजन करण्यात आले. सिद्धीविनायक गणपति मंदीर पुजारी संजय त्रिवेदी, डॉ. उपेंद्र शाह, पत्रकार योगेंद्र जोशी, गणेश सोनार, सनातन संस्थेचा भावना कदम, वसंत पाटील हिंदु जनजागृती समितीचे श्री.सतिश बागुल, श्री.राहुल मराठे, धर्मप्रेमी उज्वल राजपूत, पंकज डाबी, धीरज चौधरी, आकाश गावित, भुषण बागुल, गौरव धामणे, विजय जोशी, भरत मोरे, योगेश जोशी उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमात प्रारंभी सौरभ पंडित यांनी उपस्थितांकडून “हे आदिशक्ती, या शस्त्रांमध्ये तुझी ऊर्जा निर्माण होऊन पुढील कठीण काळात देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी त्याचा लाभ होऊ दे !” अशी सामुहिक प्रार्थना करवून घेतली. नंतर श्लोकपठण करण्यात आले. आज विजयादशमी आहे, आजच्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. प्रभू श्रीरामांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध केला. अर्जुनाने आजच्याच दिवशी शमीच्या ढोलीतून आपली शस्त्र काढून कौरवांना परास्त केले. त्यामुळे आपणही आजच्या दिवशी हिंदुराष्ट्र स्थापनेचा संकल्प करायला हवा, विजय आपला निश्चित आहे. यासाठीच आजच्या शस्त्रपूजनचे नियोजन आहे; अशा शब्दात सौरभ पंडित यांनी उद्देश स्पष्ट केला. यानंतर सतिश बागुल यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे जाहीर वाचन केले.
वाचन केलेला संदेश असा – विजयादशमी हा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विजयाचा इतिहास सांगणारा दिवस आहे. अनेक शतके पराभूत असलेल्या हिंदु समाजाच्या घरांमध्ये सध्या विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन या कृती केवळ औपचारिकता म्हणून केल्या जातात. आज शस्त्रपूजन केवळ शेतकी आणि घरगुती उपकरणांच्या पूजनापुरते मर्यादित झाले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी अपराजितादेवीचे पूजन लुप्त झाले आहे आणि पूर्वीचे युद्धासाठीचे सीमोल्लंघन आता केवळ नगराच्या वेशीबाहेरील मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापुरते सीमित झाले आहे. संदेशात पुढे म्हटले आहे की, सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांचे राज्य स्थापित झाले आहे. या अफगाणिस्तानपासून आता देहली दूर नाही. त्यामुळे काश्मीरपासून केरळपर्यंत ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) मध्ये सक्रीय असलेले आतंकवादी भारतात ‘तालिबानी राज्य’ आणण्यासाठी उत्सुक आहेत. काश्मीरमधील जिहादी संघटनांनी तालिबानचे साहाय्य मागणे, काश्मिरी नेत्यांनी तालिबानचे समर्थन करणे, पंजाब-उत्तरप्रदेशमध्ये आतंकवादी पकडले जाणे इत्यादी त्याची दृश्य उदाहरणे आहेत. ते भारतात कधीही युद्ध पुकारू शकतात. अशा स्थितीत न्यूनतम स्वतःचे, परिवाराचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी तरी सशस्त्र आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा ! अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा ! वैधानिक परवाने असलेल्या शस्त्रांचे पूजन करा ! हिंदूंच्या विजयासाठी अपराजितादेवीचे भावपूर्ण पूजन करा ! यावर्षी विजयादशमीचे खरे सीमोल्लंघन करण्याचा आरंभ म्हणून आपल्या क्षेत्रातील संशयास्पद आतंकवादी हालचालींची माहिती पोलीस-प्रशासनास द्या ! हिंदूंनो, एवढ्या कृती जरी निश्चयपूर्वक केल्या, तरी विजयादशमी साजरी केल्याचा खरा आनंद मिळेल !’ असेही सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांनी या संदेशात म्हटले आहे.
स्वतःवर आक्रमण होण्याची वाट न बघता आताच प्रशिक्षित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतः सिद्ध होणे ही काळाची गरज आहे. महिलांनी सुध्दा आपल्या महान इतिहासात अजरामर झालेल्या क्रांतिकारक यांचा आदर्श ठेऊन इतिहासातून बोध घ्यायला हवा, असे याप्रसंगी डॉ.सतिष बागूल म्हणाले. कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.