धुळे – डास निर्मुलनासाठी धुळे महानगरपालिकेने दिलेल्या ठेक्यात प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुमारे 1 कोटी 42 लाख 58 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा संशय भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका शीतल नवले यांनी केला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू ; असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. धुळे महापालिकेच्या सत्ताधारी गटात असलेल्या नगरसेवकानेच असा सनसनाटी आरोप केला, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धुळे महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नवले यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. विशेष असे की काही महिन्यांपूर्वीच बांबू खरेदीतून 97 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण देखील नवले यांनी चव्हाट्यावर आणले होते परंतु निगरगट्ट व्यवस्थेने अजून पर्यंत पूर्णतः चौकशी करून त्यावर कठोर कारवाई केलेली नाही.
आरोप करणाऱ्या निवेदनात नवले यांनी म्हटले आहे की, धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात एकात्मिक डास नियंत्रणासाठी जी निविदा प्रसिद्ध करण्यात आली त्या निविदा प्रक्रियेत दिग्विजय एंटरप्राइसेसला झुकते माप देण्यात आले. या कामासाठी इतर दोन निविदा देखील आल्या होत्या. मात्र या निविदांचे साधे दरपत्रक देखील उघडून पाहण्यात आले नाही. स्थायी समितीने दिग्विजय इंटरप्राईसेसला 4 कोटी 76 लाख 21 हजार 900 या वार्षिक दराने काम दिले. स्थायी समिती व सभापतींनी केलेल्या ठरावाच्या अधीन न राहता चुकीच्या पद्धतीने महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी करार केल्याचा आरोप नवले यांनी केला आहे. नवलेेे यांचे म्हणणे आहे की स्थायी समितीच्या ठरावामध्ये वार्षिक दरवाढीचा उल्लेख नाही. मात्र महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करारात ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्के दरवाढ देण्यात येईल, असे नमूद आहे. याचा अर्थ कंपनीला दुसऱ्या वर्षी 47 लाख 52 हजार 990 रुपये तर तिसऱ्या वर्षी 95 लाख 5 हजार 980 रुपये असे एकूण 1 कोटी 42 लाख 58 हजार 980 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. आरोग्य विभागातील जे कर्मचारी या भ्रष्टाचारात सहभागी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी नवले यांनी केली आहे.