नंदुरबार – “फेसबूक”ची कार्यदिशा देशाला घातक असल्याचा गंभीर आरोप करतांनाच भारतीय लोकांची माहिती संकलीत करून तिचा गैरवापर करणे, अश्लिलता प्रसारित करून युवा पिढीला नासवणे, असे अनेक गैरप्रकार फेसबूककडून केले जात असल्याचे “सनातन प्रभात” या दैनिकाच्या संपादकीयातून मांडण्यात आले आहे. हिंदुनिष्ठ संघटनांचा द्वृेष करून त्यांची खाती बंद करणे, पेजेस बंद करणे त्याचवेळी डॉ.झाकीर हुसेन सारख्या व्यक्तींचे व संघटनांचे प्रसारण मात्र फेसबूकने चालू ठेवणे, यावरही या लेखातून प्रखर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून काही संघटनांनी असे आक्षेप घेणे सुरु केले आहे. फेसबूक चाहत्यांना स्वत:लाच तसे निदर्शनास येत असल्याने राष्ट्रहिताचे व धर्मभावनेचे महत्व जाणणार्या असंख्य भारतीयांनी फेसबूक व्यवस्थापनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून वापरात आलेल्या या फेसबूकच्या चेहर्याआड दडलंय काय? हा प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर उमटणार्या प्रतिक्रियांमधून याचे पडसाद उमटतांना पहायला मिळतात. दरम्यान “सनातन प्रभात” या दैनिकात आज दि.१७ ऑक्टोबर २०२१ च्या अंकात “धोकेदाय फेसबूक” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या संपादकीय लेखातून फेसबूकच्या कथित कारनाम्यांविषयी लक्ष वेधून घेणारी माहिती देतांना म्हटले आहे की, फेसबूकवर कोट्यवधी लोकांची खाती आहेत. ही खाती उघडतांना वैयक्तिक स्वरूपाची पुष्कळ माहिती फेसबूक लोकांकडून ‘ऑनलाईन’ अर्जावर भरून घेतो. लोकांची आवड-नावड, त्यांची कौशल्ये, कल अशी बरीच माहिती फेसबूकला मिळते. विज्ञापनांद्वारे सामाजिक संकेतस्थळांना पुष्कळ पैसे मिळतातच; मात्र ग्राहकांची माहिती विकूनही पुष्कळ पैसे कमावता येतात. या माहितीचा संबंधित आस्थापने अनेकविध कारणांसाठी उपयोग करतात. काही वर्षांपूर्वी उघड झालेले ‘केंब्रिज नालिटिका’ प्रकरण हे त्याचे उदाहरण आहे. काही देशांतील निवडणुकांचे निकाल स्वत:ला हवे तसे लागण्यासाठी माहितीचे विश्लेषण करणार्या आस्थापनाने फेसबूककडून लोकांची माहिती घेतली होती. यानुसार निवडणुकांमध्ये कोणत्या सूत्रांवर भर द्यावा?, किती मते पडतील?, याचे आडाखे बांधू शकतो. फेसबूकने काही कोटी ग्राहकांची माहिती (डेटा) विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वापरकर्त्यांची माहिती अन्य आस्थापनाला देणे चुकीचे आहेच आणि ग्राहकांच्या अनुमतीविना हे करणे त्याहूनही चुकीचे आहे.
असे नमूद करतांनाच लेखात पुढे म्हटले आहे की, २ वर्षांपूर्वी देहली येथे झालेल्या दंगलीत हिंदू मार खात असतांना त्यांना वाचवण्यास गेलेले भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनाच फेसबूकने खलनायक ठरवले. त्यांची जगात पुष्कळ अपकीर्ती झाली. आखाती देशांमधून मिश्रा यांना धमक्यांचे दूरभाष आले. हे भारतातील लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याचे आणि झुंडशाहीला प्रोत्साहन देणारे आहे. तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यांच्या कार्यामुळे भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगाणा येथील हिंदू सुरक्षित आहेत. राजासिंह यांनाही खलनायक ठरवून फेसबूकने त्यांचे खाते बंद केले. दुसरीकडे आतंकवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांची फेसबूक खाती चालू आहेत. केरळ येथील अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमध्ये सहभाग असणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची खाती चालू आहेत, असे नमुद करून संपादकीय लेखात फेसबूकच्या धोरणांवर संशय व्यक्त केला आहे. त्याविषयी लेखात म्हटले आहे की, देहली दंगलीत याच संघटनेची मुख्य भूमिका असल्याचे समोर आले आहे.‘भारतात हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणे, हे फेसबूकचे धोरण आहे’, असे लक्षात येते.
भारत सरकारने फेसबूकला समज द्यावी, अशी अपेक्षा मांडतांना “सनातन प्रभात”च्या या संपादकीयात असेही म्हटले आहे की, सिंगापूरने स्वैर आचरण करणार्या फेसबूकला नियमांत रहाण्याची जाणीव करून दिल्यावर फेसबूकने आक्षेप घेतला; मात्र ‘सिंगापूरमध्ये कार्यरत रहायचे असेल, तर येथील कायदे-नियम यांचे पालन करावेच लागेल; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल’, अशी तंबीच तेथील अधिकारी भारतीय वंशाचे के. शणमुगन् यांनी फेसबूकला दिली. भारत सरकारला याविषयी आवाहन आहे की, त्यांनी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी फेसबूकला कठोरपणे समज द्यावी. जेणेकरून यापुढे अन्य कुठल्याही संस्था, संघटना अथवा व्यक्ती यांच्या संदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे अथवा संशयाने कारवाई करण्याचे धैर्य फेसबूक करणार नाही.
संपादकीयाच्या प्रारंभी फेसबूककडून परस्पर घालण्यात आलेल्या बंदीविषयी माहिती देतांना म्हटले आहे की, फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध (तयार) केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह “सनातन संस्थे”चाही समावेश केला आहे. हे केवळ “सनातन संस्थे”लाच नव्हे, तर संस्थेच्या कार्याशी परिचित असणार्या भारतातील अनेकांना चीड आणणारे आहे. समाजाची सात्त्विकता वाढली की, त्याच्या परिणामस्वरूप गुन्हेगारी, अनैतिकता हे आपोआपच अल्प होत जाणार आहे. त्या अनुषंगाने व्यक्ती, समाज आणि देश सात्त्विक करण्यासाठी एक छोटी संघटना शिस्तबद्ध कार्य करून त्या दिशेने वेगाने पावले उचलत असेल, तर ती धोकादायक कशी असू शकते ? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. गत २ वर्षांमध्ये फेसबूकने सनातनच्या अनेक फेसबूक खात्यांवर बंदी घातली आहे. परिणामी या माध्यमातून होणार्या धर्मप्रसारापासून जिज्ञासू वंचित झाले आहेत. फेसबूकने ही बंदी अघोषित आणि संस्थेला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची संधी न देता घातली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टीमकी वाजवली जाणार्या या देशात या बंदीविषयी बोलायला मात्र कुणीही तयार नाही, असेही या संपादकीयात म्हटले आहे.