नंदुरबार: छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून आवेष अभिनिवेष करणारे सर्वत्र पाहायला मिळतात. परंतु खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन रोज त्यांच्या विचारांची उजळणी करणारे फार थोडे दिसतात. असेच अपवादात्मक कार्य येथील हिंदू सेवा सहाय्य समिती करीत असून रोज सकाळी शिव पुतळ्याला अभिषेक करण्याचा उपक्रम वर्षभरापासून अखंडपणे राबवत आहे. कोरोनाच्या संचार बंदी काळातही हे कार्य चालू होते.
गेल्या एक वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी ७ वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू आहे. या उपक्रमाची पहिली वर्षपूर्ती तिथीनुसार आश्विन मास. शु.प. एकादशी शनिवार दि.१६ आक्टोबर २०२१ रोजी झाली. यानिमित्ताने या दिवशी वेदमंत्रांच्या घोषात शिवछत्रपती पुतळ्याचे सामूहिक अभिषेक-पूजन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जयहिंद प्रतिष्ठानचे मोहित राजपूत, विहिंप दादा शिनगर, क्षत्रीय राणा राजपूत समाज सेवा समितीचे चेतन राजपूत व पदाधिकारी, हिंदु जनजागृती समितीचे डॉ सतिष बागुल व कार्यकर्ते तसेच शिवभक्त, हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालधारकरी विनायक राजपूत यांनी घोषणा देत तसेच आकाश गावित यांनी प्रेरणामंत्राच्या पठणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याचा उद्देश सांगितला. वेदमंत्र पठण, माल्यार्पण ह भ प रविंद्र पाठक महाराज यांनी केले महाराजांची आरती आणि ध्येय मंत्र, घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.